बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्प योजनेची बातच न्यारी! कधी निकृष्ट दर्जाचे रस्ते वर्षानुवर्षे लांबवत बनवायचे, मग पुन्हा तेच रस्ते वीजवाहिन्या,
पाण्याची पाईपलाईन, गॅस पाईपलाईन, गटारी अशा कारणांसाठी रस्त्यांवर खोदकाम करणे, आणि मग खोदलेले रस्ते अर्धवट स्थितीत सोडून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणे असा बेताल कारभार स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामादरम्यान झाला आहे. आज याच स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामामुळे ट्रक रस्त्यात अडकून बसल्याची घटना घडली आहे.
रस्त्याकडेला केलेले खोदकाम व्यवस्थित न बुजवल्यामुळे तांदळाची पोती भरलेल्या ट्रकची एका बाजूची चाके जमिनीत घुसून ट्रक जागेवरच अडकून पडल्याची घटना आज सोमवारी सकाळी रेल्वे ओव्हर ब्रिजनजीक फायर ब्रिगेड स्टेशन समोरील खानापूर रोडवर घडली.
ट्रक रूतून पडलेल्या ठिकाणचे व्यवस्थित न बुजवलेले खोदकाम नेमके कशासाठी केले होते हे समजू शकले नाही. मात्र ड्रेनेज, पाणी वगैरेंच्या पाईपलाईनसाठी केलेले खोदकाम संबंधित विभागाकडून किती निष्काळजीपणे बुजवले जाते याची प्रचिती आजच्या या घटनेवरून येत होती.
दरम्यान, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत खानापूर रोडचे काम व्यवस्थित केले जात नसल्याचा आरोप पूर्वीपासून होत आहे. आता उपरोक्त घटनेमुळे सोशल मीडियावर बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडवर जोरदार टीका केली जात आहे.
एका नेटकऱ्याने तर ‘या स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना गोळी घालण्याची प्रक्रिया काय आहे?’ असे विचारले आहे. एकाने फक्त ‘घोटाळा’ असे नमूद केले आहे. तर अन्य एकाने ‘प्रथम कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ता तयार करायचा, मग लक्षात येतं की अरेच्चा आपण पाईपलाईनच घातली नाही, मग पुन्हा तो नवा तयार केलेला रस्ता खोदायचा… स्मार्ट सिटीत स्वागत आहे’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बेळगाव मध्ये राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी कामकाजाच्या ठिकाणी अशाचपद्धतीची कामे करण्यात आली असून या कामकाजाविरोधात आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांविरोधात जनता ताशेरे ओढत आहे.
स्मार्ट सिटी कामकाज सुरु झाल्यापासूनच जनतेचा रोष पत्करावा लागत असून या स्मार्ट सिटी योजनेचा बेळगावकरांना खऱ्या अर्थाने लाभ कधी होणार? असा सवाल संतप्त बेळगावकरांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे.