बेळगाव लाईव्ह : वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सर्वसामान्य जनतेची गैरसोय करण्याचा विडा उचललेल्या बेळगावच्या रहदारी पोलिसांनी ४-५ दिवसांपूर्वी कॉलेज रोडवर सन्मान हॉटेलसमोर बॅरिकेड्स घालून दुभाजक ओलांडणारा रस्ता बंद केला आहे. यामुळे येथील वाहतूक सुरळीत झाली असली तरी हा प्रकार पादचारी आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरताना दिसत आहे.
या भागात असणाऱ्या शाळेत शहरातील कंग्राळ गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली आदींसह विविध गल्लीतून विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेला येतात. मात्र याठिकाणी अचानक घालण्यात आलेल्या बॅरीकेड्समुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागत आहे.
शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते यंदे खूट चौक दरम्यानच्या कॉलेज रोडच्या दुपदरी रस्त्यावर वाहनचालकांच्या सोयीसाठी दोन ठिकाणी दुभाजक न घालता रस्ता खुला ठेवण्यात आला आहे. मोठी रहदारी असणाऱ्या सदर मार्गावर शाळा, महाविद्यालये तसेच हॉस्पिटल्स, विविध प्रकारची दुकाने असल्यामुळे वाहन चालकांना तातडीच्या कामासाठी गैरसोय न होता चटकन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाता यावे यासाठी ही सोय करण्यात आली आहे.
मात्र कांही दिवसांपूर्वी रहदारी पोलिसांनी कोणतीही पूर्व सूचना न देता यापैकी हॉटेल सन्मान समोरील खुला रस्ता बॅरिकेड्स घालून अचानक बंद केला आहे.
कॉलेज रोडवरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी ही उपाययोजना करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण रहदारी पोलिसांकडून दिले जात आहे. मात्र रस्ता ओलांडण्यासाठीचा सुरळीत मार्ग बॅरिकेड्स टाकून अचानक बंद करण्यात आल्यामुळे या भागातील पादचारी नागरिक आणि शालेय मुला -मुलींची मोठी गैरसोय झाली आहे. हॉटेल सन्मानसमोरील कॉलेज रोडवर घातलेले बॅरिकेड्समुळे शालेय मुलांना सध्या जीवावर बेतणारा प्रवास करावा लागत आहे. या मुलांना बॅरिकेड्समुळे मिळेल त्या वाटेने जीव मुठीत धरून सततची रहदारी असणारा कॉलेज रोड ओलांडावा लागत आहे. यामुळे पालकवर्गाची चिंता मात्र वाढली आहे.
दुसरीकडे हॉटेल सन्मान समोरील कॉलेज रोडवर असलेल्या या बॅरिकेड्समुळे चन्नम्मा सर्कल येथून सन्मान हॉटेलसह तेथील नजीकचे हॉस्पिटल, गांधी भवन या ठिकाणांसह काळी आमराई वगैरे परिसरात जाऊ इच्छिणाऱ्या वाहन चालकांना आता लिंगराज कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंतचा वळसा मारून माघारी यावे लागत आहे. यामुळे लिंगराज कॉलेज मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी वाहने वळवून घेणाऱ्या वाहन चालकांची रस्त्यावर एकच गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे. हीच अवस्था यंदे खूट येथून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला सरदार हायस्कूल परिसरात जाणाऱ्या वाहन चालकांची होत आहे. त्यांना थेट चन्नम्मा चौकापर्यंत जावे लागत आहे.
परिणामी वाहन चालकांना मनस्ताप होण्याबरोबरच त्यांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. सर्वात मोठी समस्या कॉलेज रोडच्या आसपास असलेल्या विविध शाळा महाविद्यालयांमधील मुला -मुलींची आहे. मोठ्या संख्येने मिळेल त्या मार्गाने दुभाजक ओलांडून घाई गडबडीत कॉलेज रोडवर ये-जा करणारी ही मुले पाहता एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी प्रशासनासह रहदारी पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेऊन हॉटेल सन्मान समोरील बॅरिकेड्स हटवून योग्य ती समर्पक उपाययोजना करावी, अशी मागणी पालकवर्गासह वाहन चालक आणि नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.