Wednesday, May 8, 2024

/

युद्धपातळीवर बळ्ळारी नाला स्वच्छतेची गरज

 belgaum

बेळगाव पूर्व भागात वसलेल्या पावसाळ्यात शहरातील पाण्याचा निचरा करण्यात मुख्य भूमिका निभावणाऱ्या बळ्ळारी नाल्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवत, झाडे-झुडपे आणि जलपर्णीचे मुसळधार पावसाला सुरुवात होण्यापूर्वी युद्धपातळीवर उच्चाटन करण्याची, तसेच नाल्याची सफाई करण्याद्वारे त्याची खोली वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.

बल्लारी नाल्याच्या साफसफाईसह त्याच्या विकासासाठी दरवर्षी लघुपाटबंधारे खात्याला निधी मंजूर होत असतो. मात्र सदर नाल्याचे खोदकाम तसेच येथील वाढलेले झाडे झुडपे काढण्याचे ठोस काम गेल्या 2013 पासून झालेच नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दरवर्षी पावसाळ्यात या नाला परिसरातील शेतकऱ्यांना पुराच्या स्वरूपात मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या नाल्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाले असून सध्या हा नाला गवत, झाडे-झुडपे आणि जलपर्णीने व्यापला आहे. नाल्यात गाळ वाढल्याने नाल्याचे अस्तित्व जणू नष्ट होत चालले आहे.Bellari nala

 belgaum

परिणामी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होऊन शहरातील ठिकठिकाणच्या सखल भागात पाणी साचून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असते. तसेच नाल्या शेजारील घराघरात पाणी शिरलेले पहावयास मिळते. बेळगावच्या पूर्वेस मच्छे गावापासून सुरू होणारा आणि येरमाळ, अनगोळ, वडगाव, शहापूर, हलगा, बसवन कुडची, सांबरा शिवारांमार्गे वाहणाऱ्या या बळ्ळारी नाल्याला शहरातील लेंडी नाल्याचे पाणी देखील मिळते. एकंदर पावसाळ्यात बेळगाव पूर्व भागातील पाणी मोठ्या प्रमाणात या नाल्यातून वाहत असते. या पार्श्वभूमीवर सदर नाल्याची साफसफाई करून गाळ काढून खोली वाढविणे आणि अतिक्रमण हटवून नाल्याची रुंदी वाढविणे अत्यंत गरजेचे आहे.

अतिवृष्टीवेळी बळ्ळारी नाला परिसरातील शेकडे एकर जमिनीतील उभी पिके पाण्याखाली जात असतात. मात्र त्याचे कोणतेही सोयरसुतक प्रशासनाला नसल्याचे दिसून येते. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. नाल्यातील वाढलेल्या झाडे-झुडपे, गवत आणि जलपर्णीमुळे या ठिकाणी नाला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्याआधी नाल्याचे विकास काम हाती घेणे गरजेचे होते. मात्र ते घेण्यात आले नाही. यामुळे निदान आता मोक्याच्या ठिकाणी तरी जेसीबीद्वारे खोदकाम करून जलपर्णी व गाळ काढल्यास काहीसा दिलासा मिळणार आहे.

बळ्ळारी नाला हा गटार नसून शुद्ध पाण्याचा स्त्रोत असणारा एक मोठा ओढा आहे. त्यामुळे असे शुद्ध पाण्याचे स्त्रोत असलेल्या ओढ्यांची चांगली देखभाल करून त्यांचं नैसर्गिक अस्तित्व अबाधित राखणं गरजेचं असतं. शुद्ध पाण्याचा स्त्रोत असलेल्या नदी ओढ्यांच्या काठीच गाव अथवा नागरी वसाहती वसतात.

या पद्धतीनेच बळ्ळारी नाल्याकाठी बेळगाव शिवार, येळ्ळूर शिवार, जुने बेळगाव शिवार यासारखी शिवार आणि लोक वसाहत निर्माण झाली. एकेकाळी बळ्ळारी नाल्यातील पाणी पिण्यासाठी वापरले जात होते. मात्र प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आता दुर्दैवाने या नाल्याची गटारगंगा झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.