कर्नाटक मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (केएमएफ) यापूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार उद्या मंगळवार दि. 1 ऑगस्ट 2023 पासून राज्यभरात नंदिनी दुधाच्या दरामध्ये 3 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केएमएफ प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये सदर दरवाढीचा निर्णय घेण्यात आला होता.
कर्नाटक मिल्क मार्केटिंग फेडरेशनला प्राप्त होणाऱ्या दुधाच्या प्रमाणात घट झाल्यामुळे नंदिनी दुधाची दरवाढ अपरिहार्य असल्याचे संबंधित खात्याच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. उद्या 1 ऑगस्टपासून जी दरवाढ करण्यात आली आहे ते दरवाढीचे 3 रुपये केएमएफला दूध पुरवणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.
एकंदर आता उद्यापासून सर्व प्रकारचे नंदिनी दूध आणि दह्याचा सुधारित दर प्रति लिटर/ किलो 3 रुपयांनी जास्त असणार आहे. नंदिनी दूध आणि दह्यांचे सुधारित विक्री दर पुढील अनुक्रमे (दुधाचा प्रकार /दही, प्रतिलिटर सध्याचा दर, सुधारित दर यानुसार) पुढीलप्रमाणे आहेत. टोन्ड दूध (निळे पाकीट) प्रति लिटर : सध्याचा दर 39 रु. -सुधारित दर 42 रु.. होमोजीनाईझ टोन्ड दूध प्रति लिटर : 40 रु. -43 रु., गाईचे दूध (हिरवे पाकीट) प्रति लिटर : 43 रु. -46 रु.. शुभम (केशरी पाकीट)/ खास दूध प्रति लिटर : 45 रु. -48 रु.. दही प्रति किलो : 47 रु. -50 रु. ताक 200 एमएल पाकीट : 8 रु. -9 रुपये.
सध्याची 3 रुपयांची दरवाढ केएमएफ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील दिलासा देणारी असली तरी ग्राहकांच्या खिशावर 3 रुपये दरवाढीचा बोजा पडणार आहे. मात्र दुधाच्या इतर ब्रँड्सच्या तुलनेत नंदिनी दुधाचा वाढीव दर कमीच आहे.
त्यामुळे नंदिनीच्या विक्रीवर कोणताही परिणाम होणार नाही. नंदिनी दूध अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा फेडरेशनचा प्रयत्न चालू असल्यामुळे दूध दरवाढ जरी झाली असली तरी फेडरेशन निश्चित उपाय योजना आखून नंदिनी दुधाच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची शक्यता आहे.
कर्नाटक बरोबरच गोवा, महाराष्ट्र राज्यात नंदिनी दुधाची विक्री चांगल्या प्रमाणात होत असल्याने कर्नाटक मिल्क मार्केटिंग फेडरेशनचा नफा वाढण्याची शक्यता आहे.