उचगाव (ता. जि. बेळगाव) ग्रामपंचायतच्या नूतन अध्यक्षपदी मथुरा बाळकृष्ण तेरसे यांची तर उपाध्यक्षपदी त्यांचे पती बाळकृष्ण खाचू तेरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या पद्धतीने ग्रा. पं. सदस्यांनी पर्यायाने गावकऱ्यांनी चक्क पती -पत्नीच्या हातात गावचा कारभार सोपविल्याची दुर्मिळ घटना बेळगाव तालुक्यात घडली आहे.
जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुका पार पडल्या. त्या अनुषंगाने बेळगाव तालुक्यातील जवळपास 8 हजार लोकसंख्येच्या उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक देखील शांततेने सुरळीत पार पडली. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये विरोधी गटाच्या सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेला आपली अनुपस्थिती दर्शविल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी मथुरा बाळकृष्ण तेरसे व बाळकृष्ण खाचो तेरसे दापत्याची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
बेळगाव तालुक्यामध्ये उचगाव ग्रामपंचायतीमध्ये पती-पत्नी या दापत्यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून निवडून येण्याचा मान मिळवल्याने संपूर्ण तालुक्यात हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
उचगाव, बसुर्ते आणि कोणेवाडी अशा तीन गावची मिळून असलेली ही ग्रामपंचायत एकूण 21 सदस्यांची आहे. या निवडणूकचे गेल्या महिन्याभरापासून आरक्षण जाहीर झाल्यापासून दोन गटांमध्ये जोरदार रस्सीखेच चालू होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी महिला व पुरुष इच्छुक होते. मात्र अखेर एका गटाकडे 13 सदस्यांचे संख्या बळ झाल्याने दुसऱ्या गटाला आपण यामध्ये विजयी होणार नाही याची चाहूल लागताच सदर 8 सदस्यांचा गट या निवडणूक प्रक्रियेस उपस्थित राहिला नाही. त्यामुळे अध्यक्ष म्हणून मथुरा बाळकृष्ण तेरसे व उपाध्यक्ष म्हणून बाळकृष्ण खाचो तेरसे या दापत्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून पाटबंधारे खात्याचे सहाय्यक अभियंता संजीवकुमार म्हांळगी उपस्थित होते.
बिनविरोध निवडीनंतर तेरसे दापत्यांची खुल्या जीपमधून फटाक्यांच्या आतषबाजीत गुलालाची उधळण करत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील सर्व देव -दैवतांच्या मंदिरामध्ये जाऊन तेरसे दापत्याने आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना बाळकृष्ण तेरसे यांनी माझा कोणावरही राग नाही. सर्व सदस्यांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्यातून आम्ही गावाचा सर्वांगीण विकास साधू असे सांगून आतापर्यंत जसे सहकार्य आम्हाला मिळाले तसेच यापुढेही मिळावे आणि गावचा विकास साधण्यासाठी मदत करावी, असे आवाहन केले. ग्रामपंचायत निवडणुकीत मथुरा तेरसे व बाळकृष्ण तेरसे या दोघांनीही एकाच वार्डातून विजय प्राप्त केलेला होता.
तसेच त्यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक लढवली आणि दोघांचीही अनुक्रमे उपाध्यक्ष व अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. तेरसे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षापासून गावात सामाजिक व शैक्षणिक कार्य करत आहे. त्याचीच पोचपावती म्हणून सर्व सदस्यांनी बाळकृष्ण व मथुरा तेरसे या पती-पत्नीच्या हातात ग्रामपंचायतीचा कारभार सोपवला आहे.