पश्चिम घाटात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सध्या खानापूर तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. येथील मलप्रभा नदी जवळपास तुडुंब भरून वाहत असल्यामुळे जांबोटी जवळील श्री क्षेत्र हबनहट्टी मारुती मंदिर आज बुधवारी सकाळी अर्ध्याहून अधीक पाण्याखाली गेले होते.
पश्चिम घाटात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे गेल्या कांही दिवसांपूर्वी कोरड्या पडत चाललेल्या खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. जांबोटी जवळील श्री क्षेत्र हब्बनहट्टी मारुती मंदिराच्या ठिकाणी तर ही नदी तुडुंब भरून वाहत आहे.
गेल्या 24 तासात या कणकुंबी परिसरामध्ये जवळपास 250 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दमदार पावसामुळे श्री क्षेत्र हब्बनहट्टी मारुती मंदिर मलाप्रभा नदीपात्रात बुडाले आहे.
आज बुधवारी सकाळी नदीचे पाणी मंदिराच्या छतापर्यंत पोहोचण्यास अवघ्या कांही फुटांचे अंतर कमी होते. दरवर्षी जुलै महिन्यात हे मंदिर नदीच्या पाण्याखाली जात असते. पावसाच्या विलंबामुळे यंदा हे घडण्यास जुलैचा अर्धा महिना उलटून गेला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा मलप्रभा नदी उशिरा प्रवाहित झाली असली तरी त्यामुळे सर्वाना विशेष करून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
एकंदर यंदा पावसाळा उशिराने सुरू झाला असला तरी सध्या समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे खानापूर व बेळगाव तालुक्यातील सर्वच नदी, नाले प्रवाहित झाले आहेत.
तिलारी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि पावसाअभावी यंदा तळ गाठलेल्या राकसकोप जलाशयाची पाणी पातळी देखील जवळपास 7 फुटाने वाढली आहे. त्यामुळे बेळगाव शहरातील पाणी टंचाईचा प्रश्न निकालात निघाला आहे.