आयुष्याला सामोरे जात असताना प्रत्येकाने आपल्या मनावर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे असून शीघ्र समाधान मिळवण्यासाठी तुम्ही तुमची स्थिरता गमावू नका, असा सल्ला पुणे येथील मानसोपचार सल्लागार उज्वला भोईर (नागपुरे) यांनी दिला.
हिंदवाडी येथील केएलएस-आईएमईआर कॉलेजमध्ये आयोजित व्याख्यानप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर आईएमईआर कॉलेजचे प्राध्यापक डॉ. सुशीलकुमार पारे व संजीवीनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ उपस्थित होत्या.
संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल व्हावा म्हणून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तर्कहीन आणि तर्कशुद्ध विचारांना वेगळे करून तुम्ही तुमची विश्वास प्रणाली सुधारली पाहिजे. आयुष्याला सामोरे जात असताना प्रत्येकाने आपल्या मनावर ताबा ठेवणे अत्यंत गरजेचे असून जीवनातले येणारे बरेवाईट अनुभव,ताण तणाव सहन करण्याची क्षमता आपल्यात हवी असते.
यासाठी आपली शारीरिक तंदुरुस्ती उत्तम राखणे महत्वाचे आहे, म्हणून रोजच्या धावपळीच्या जीवनात किमान थोडा वेळ तरी आपण नियमित योगा प्राणायाम किंवा इतर व्यायाम करणे गरजेचे असल्याचे उज्वला भोईर यांनी सांगितले.
प्रारंभी कॉलेजचा विद्यार्थी शांतवीर याने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविकात डॉ. देगीनाळ यांनी व्याख्यानाचा उद्देश सांगत असताना मुलांच्या मनामध्ये स्थिरता दिसत नसून एखाद्या ठिकाणी नोकरीत रुजू झाल्यानंतर क्षुल्लक कारणास्तव नोकरी सोडून घरात बसण्याची किंवा दुसऱ्या नोकरीच्या शोधात फिरण्याची सवय निर्माण झाली आहे. यासाठीच मानसिक स्थिरता महत्वाची आहे आणि ही कशी मिळवता येईल हे समजून घेण्यासाठी हे व्याख्यान आयोजित केले असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. सुशीलकुमार म्हणाले की, आज उज्वला भोईर (नागपुरे) यांनी खूप सोप्या पद्धतीने आपली मानसिकता कशी सुधारावी याबद्दल विवेचन केले. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टींपैकी एकजरी गोष्ट तुम्ही आचरणात आणलीत तर आजच्या व्याख्यानाचा काहीतरी उपयोग झाला याचे समाधान लाभेल. शेवटी मंजुळा या विद्यार्थिनीने उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी -विद्यार्थिनींचे आभार मानले.