बेळगाव लाईव्ह :केंद्रामध्ये विरोधी आघाडी तयार करण्यासाठी बंगळूर येथे देशभरातील विविध पक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटक सरकारला सीमावाशीयांना मराठी भाषेतून कागदपत्रे व इतर हक्क देण्यासाठी सूचना कराव्यात, अशी मागणी सीमा भागातून होत आहे.
बंगलोर येथे सोमवारपासून देशातील विविध विरोधी पक्षांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते ही उपस्थित आहेत. कर्नाटकात सध्या काँग्रेसचे सरकार आहे.
या पक्षाच्या सीमा भागातील अनेक नेत्यांनी सीमा वासियांना मराठीतून कागदपत्रे देण्याबाबत वारंवार घोषणा केल्या आहेत. पण प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे मराठी मतांवर निवडून आलेल्या या नेत्यांना आणि सरकारला जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे.विरोधी आघाडीच्या बैठकीवेळी महाराष्ट्रातील नेत्यांनी याबाबत कर्नाटक सरकारला सूचना करण्याची गरज आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने समावेश यांच्या पाठीशी राहुन नेहमीच योगदान दिले आहे. बैठकीला शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित आहेत.
महाराष्ट्रातील या नेत्यांना सीमा वासियांचे दुःख चांगलेच माहिती आहे.
बेळगावच्या महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विजापूरचे उद्योग आणि मूलभूत विकास मंत्री एम बी पाटील यांनी काल विमान तळावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत आणि युवा सेनेचे आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले होते त्या बेळगाव जिल्ह्यातील नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांनी सूचना कराव्यात अशीही मागणी वाढू लागली आहे.
केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयोग आणि उच्च न्यायालयाने सीमा भागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्र देण्याबाबत आदेश बजावले आहेत. पण या आदेशांवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी मराठी कागदपत्र बाबत कर्नाटक सरकारला विनंती करावी अशी मागणी सीमा भागातून होत आहे.