बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र – कर्नाटक सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या तालुक्यातील बेळगाव जिल्ह्यालगत असणाऱ्या शिडहळ्ळी या गावातील नदीकाठावर मानवी कवट्या आढळून आल्याने खळबळ माजली आहे.
या भागात असणाऱ्या दूधगंगा नदीच्या काठावर हा प्रकार आढळून आला असून शेतकरी जनावरांना धुण्यासाठी गेला असता हा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी हि माहिती तातडीने कागल पोलीस स्थानकाला कळविली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलिसांनी सुरु केला असून चारही कवट्या पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.
कर्नाटक आणि महाराष्ट्रात असे प्रकार सातत्याने घडत असून पोलिसांसाठी हि डोकेदुखी ठरत आहे. याप्रकरणी महाराष्ट्र – कागल पोलिसांनी कर्नाटक पोलिसांना देखील हि माहिती दिली असून ताब्यात घेण्यात आलेल्या कवट्या कागल तालुका रुग्णालयात पाठविण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी अधिक तपास हाती घेण्यात आला असून पोलीस तपासात काय याप्रकरणी पोलीस माहितीतून कोणत्या गोष्टी हाती लागतील याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मान्सून लांबल्याने दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत घट झाली आहे. यामुळे नदीने तळ गाठला असून परिणामी अशा गोष्टी पुढे येत आहेत. शिडनळ्ळी गावात एकाच ठिकाणी चार मानवी कवट्या सापडल्याने अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. ही बाब समजताच या कवट्या पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.