तब्बल 46 वर्षांनी हिडकल जलाशयातील पाणी कमी झाल्याने दर्शन देत असलेले होन्नुर (ता. हुक्केरी) येथील श्री विठ्ठल मंदिर गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने पुन्हा पाण्याखाली जाऊ लागले आहे.
यंदा मान्सूनचे आगमन प्रचंड लांबल्यामुळे परिणामी जून महिन्यात पावसाने घटप्रभा नदीची पाणी पातळी अत्यंत खालावली होती. त्याचा परिणाम हिडकल जलाशयावर होऊन जलाशयात अवघा 2 टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. या पद्धतीने पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्यामुळे या जलाशयातील होन्नुर (ता. हुक्केरी) येथील पुरातन श्री विठ्ठल मंदिराने सर्वांना दर्शन देण्यास सुरुवात केली होती.
याआधी 46 वर्षांपूर्वी या पद्धतीने जलाशयाच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत असलेल्या या श्री विठ्ठल मंदिराचे दर्शन झाले होते. त्यानंतर प्रथमच यंदा हे श्री विठ्ठल मंदिर पाण्याबाहेर आल्यामुळे गेल्या कांही दिवसांपासून देवदर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी होत होती. मात्र आता गेल्या दोन-तीन दिवसापासून पश्चिम घाटासह महाराष्ट्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे घटप्रभा नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे हिडकल जलाशयात पाण्याची आवक हळूहळू वाढण्यास सुरू झाली आहे.
हिडकल मंदिर पाण्याखाली जायला सुरुवात pic.twitter.com/IDxIpfpayd
— Belgaumlive (@belgaumlive) July 19, 2023
त्यामुळे नदीपात्रातून खुल्यावर आलेले श्री विठ्ठल मंदिर आता हळूहळू पुन्हा पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी या मंदिरातील श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्याचा योग पुन्हा केंव्हा येईल कोणास ठाऊक? असा विचार करून भाविक सध्या मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी धडपडत आहेत.
जलाशय काठापासून मंदिरापर्यंत बांधलेल्या दोरीच्या सहाय्याने किंवा एकमेकांच्या हाताला धरून गुडघाभर पाण्यातून भाविक माऊलीचे दर्शन घेण्यासाठी जाताना दिसत आहेत.