बेळगाव लाईव्ह:महिलांच्या गळ्यातील सोन साखळी चोरट्यांकडून लंपास करण्याच्या घटना केवळ शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील घडत आहेत.
फिल्मी स्टाईलने दुचाकीवरून पाठलाग करत चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील
१ लाख २० हजार रुपये किंमतीची वीस ग्रॅमची सोनसाखळी चोरट्यानी हातोहात लंपास केली. सोमवार (ता. १७) रात्री ८.४५ च्या सुमारास मच्छे गावातील बेळगाव खानापूर रोडवरील माऊली हॉटेल जवळ ही घटना घडली आहे .
वीणा धोंडीराम तारनाळे (रा. मजगावकर नगर मच्छे) असे दागिने चोरीला गेलेल्या महिलेचे नाव असून याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात मंगळवार (ता.१८,) दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार फिर्यादी वीणा यांचे वाघवडे क्रॉस येथे कपड्याचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे काल दिवसभर दुकान सुरू ठेवून रात्री दुकान बंद करून त्या बेळगाव-खानापूर रोडवरून चालत घरी जात होत्या. त्या माऊली हॉटेल नजीक आल्यानंतर पांढऱ्या रंगाच्या मोटरसायकलून आलेल्या अंदाजे २८ ते ३० वयोगटातील दोघे तरुण त्यांच्या मागून आले. दुचाकीच्या मागे बसलेला तरुण खाली उतरुन त्यांच्या पाठीमागून आला. त्याच्या उजव्या हातात असलेल्या चाकूने वीणा याना धमकावत डाव्या हाताने यांच्या गळ्यातील वीस ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून भामट्याने पलायन केले.
सोनसाखळी लांबविण्यात आल्यानंतर वीणा यांनी आरओरड केली. मात्र, तोपर्यंत भामटे पळून जाण्यात यशस्वी झाले होते. सदर घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक लकाप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यानी तातडीने घटनास्थळी भेट देऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाल्याने त्यांचा थांगपत्ता लागू शकला नाही. याप्रकरणी मंगळवारी वीणा यानी बेळगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून अधिक तपास करत आहे.