बेळगाव विमानतळाची नवी टर्मिनल इमारत आणि संबंधित इतर विकास कामांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) 229.57 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. इतका लक्षणीय निधी उपलब्ध करण्याचा हेतू बेळगाव विमानतळाचे आंतरराष्ट्रीय केंद्रात रूपांतर करण्याचा असू शकतो.
एएआयकडून बेळगाव विमानतळाचे आंतरराष्ट्रीय केंद्रात अर्थात विमानतळात रूपांतर करण्याचा हेतू असला तरी हा हेतू साध्य करण्यासाठी अतिरिक्त 56 एकर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. यासंदर्भात विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यांची नुकतीच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी बैठक पार पडली. विमान प्रवाशांच्या संख्येत झालेली मोठी वाढ लक्षात घेऊन नव्या टर्मिनल इमारतीची उभारणी किती गरजेची आहे हे सल्लागार समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पटवून दिले आहे.
बेळगाव विमानतळाचा संभाव्य कायापालट लक्षात घेता. नव्या टर्मिनल इमारतीच्या 16,400 चौ. मी. जागेसह बेळगाव विमानतळाची नवी टर्मिनल इमारत 20,000 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेली असेल. त्याचप्रमाणे सध्याच्या टर्मिनल इमारतीचे अराईव्हल्स अर्थात प्रवासी आगमन इमारतीत रूपांतर करण्यासाठी अतिरिक्त 3600 चौ. मी. क्षेत्र वापरले जाईल.
एकदा का नव्या टर्मिनल इमारतीचा आराखडा तयार झाला की तो सादर करून मंजुरी घेतली जाईल. त्यामुळे येत्या 2024 च्या पहिल्या तिमाहीमध्ये प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. बेळगाव विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचा हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी जवळपास 36 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.