बेळगाव महापालिकेच्या राखीव निधीतून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शहरातील 24 विद्यार्थी विद्यार्थिनींना लॅपटॉपचे वितरण करण्यास महापालिकेच्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
महापालिका आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष रवी धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली काल बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या राखीव निधीतून अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जातात त्यासाठी महापालिकेकडे 24 अर्ज आले होते. हे सर्व अर्ज वैध ठरल्याने संबंधित विद्यार्थी विद्यार्थिनींना लॅपटॉप वितरण करण्यास अध्यक्ष रवी धोत्रे यांनी मंजुरी दिली.
मात्र शहरातील महापालिकेच्या मालकीच्या चार आयुर्वेदिक दवाखान्याचे आयुष विभागाकडे हस्तांतरण करण्याच्या विषयावर पुढील बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याचे निश्चित केले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या उद्यानामध्ये कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेले कर्मचारी आणि रखवालदार यांच्या कंत्राटाला मुदतवाढ देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. शहर स्वच्छतेसाठी कंत्राटी तत्त्वावर 138 अतिरिक्त सफाई कर्मचारी नियुक्त करण्याच्या आरोग्य विभागाच्या प्रस्तावालाही बैठकीत मंजुरी देण्यात आली.
रस्त्यावर गटारीत टाकले जाणारे वाळू, खडी वगैरे बांधकामाचे साहित्य, मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण, महापालिकेच्या वाहनांची दुरुस्ती आदी विषयांवरही बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतले गेले.
बैठकीस महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.