महिन्याभरापासून बेळगाव महापालिकेचे महसूल कर्मचारी अंगणवाडी सर्वेक्षणात व्यग्र असले तरी काल बुधवारी 5 जुलैपर्यंत महापालिकेने तब्बल 31 कोटी रुपये घरपट्टी वसूल केली आहे. या पद्धतीने महापालिकेची घरपट्टी वसुलीतील आघाडी कायम आहे.
गेल्या महिन्यात 7 जूनपर्यंत 26 कोटी रुपये घरपट्टी पासून झाल्याची माहिती पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत देण्यात आली होती. त्यानंतर महिन्याभरात 5 कोटी रुपये घरपट्टी वसूल करण्यात महसूल विभागाला यश आले आहे. महसूल कर्मचाऱ्यांवर गेल्या महिन्याभरापासून शहरातील खाजगी इमारतींमध्ये भरविल्या जाणाऱ्या अंगणवाडी केंद्रांसाठी शासकीय जागा किंवा इमारत शोधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना घरपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रित करता आले नाही. तरीही शहरातील मिळकत धारकांनी स्वयंस्फूर्तीने घरपट्टी भरली आहे. त्यामुळेच महिन्याभरात 5 कोटी रुपये वसूल होण्याबरोबरच काल 5 जुलै 2023 पर्यंत महापालिकेकडे तब्बल एकूण 31 कोटी रुपये घरपट्टी जमा झाली आहे.
यंदा एप्रिल महिन्यात सुरू झालेली विधानसभा निवडणूक प्रक्रिया 15 मे पर्यंत चालली होती महापालिकेच्या अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत व्यग्र होते. त्यामुळे घरपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर आता गेल्या महिन्याभरापासून महसूल कर्मचारी अंगणवाडी सर्वेक्षणात व्यस्त आहेत. मात्र तरीही यंदा घरपट्टी वसुलीचे प्रमाण चांगले आहे.
गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेने विक्रमी म्हणजे सुमारे 51 कोटी रुपये घरपट्टी वसूल केली आहे. त्यामुळे यंदा त्याहून जास्त घरपट्टी वसूल करण्याचे आव्हान महसूल विभागासमोर आहे. तथापि महसूल कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण व अन्य कामे दिली जात असल्यामुळे त्याचा परिणाम घरपट्टी वसुलीवर होत असल्याची चर्चा आहे.