बेळगाव लाईव्ह : आजपासून कर्नाटक सरकारच्या गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. मात्र कर्नाटक वन केंद्रात नागरिकांना सर्व्हर डाउनच्या समस्येला सामोरे जावे लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
कर्नाटक वन केंद्रात गृहलक्ष्मी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी आज मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र अर्ज भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना सर्वर डाऊनच्या समस्येला सामोरे जावे लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
सरकारने योजना जाहीर केली खरी मात्र योजना कार्यान्वित करताना योग्य प्रक्रिया राबवावी, नागरिकांचे हाल आणि हेलपाटे होणार नाहीत याचीही काळजी घेण्यात यावी, अशी मागणी नागरीकातून करण्यात येत होती. कर्नाटक वन आणि ग्राम वन अशा केवळ दोन वेबसाईटवर अर्ज भरण्याची मुभा देऊनही सर्व्हर डाऊनची समस्या उद्भवली आहे.
मात्र या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी इतर ठिकाणीही मुभा दिली तर सर्व्हर डाऊन किती मोठ्या प्रमाणात होईल, असा प्रश्नही नागरीकातून उपस्थित करण्यात येत होता.
कर्नाटकात सत्ता स्थापन व्हावी या उद्देशाने काँग्रेसने निवडणुकीपूर्वी जनतेला पाच हमी योजनांची खैरात जाहीर केली. मात्र या योजनांचे नियोजन आणि योग्य अभ्यास काँग्रेसला न करता आल्याने पहिल्या टप्प्यातच या योजनांमध्ये अनेक त्रुटी आढळून येत आहेत.
पाच हमी योजनांपैकी शक्ती मोफत बसयोजना आणि अन्नभाग्य योजना या दोन योजना लागू केल्यानंतर पहिल्या टप्प्यातच काँग्रेस सरकारला अनेक गोष्टींना सामोरे जावे लागले. केंद्राकडून अतिरिक्त तांदूळ साठा देण्यात आला नसल्याने अखेर १० किलो ऐवजी ५ किलो तांदूळ आणि ५ किलो तांदळाचे प्रति ३४ रुपये किलो दराने नागरिकांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची वेळ आली. दुसरीकडे शक्ती योजने अंतर्गत सुरु केलेल्या महिलांसाठी मोफत बसप्रवास योजनेतही बस संख्या कमी आणि मोफत बसप्रवासाचा लाभ घेण्यासाठी महिलांची होत असलेली तुडुंब गर्दी हे पाहता या योजना जाहीर करण्यापूर्वी आणि जारी करण्यापूर्वी काँग्रेसने पूर्वनियोजन केले नसल्याचेच उघड होत आहे.
काँग्रेस सरकारच्या या योजना अद्यापही काही नागरिकांच्या पदरी पडल्याचं नाहीत त्यामुळे अनेक नागरिक याबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. सध्या गृहलक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना २००० रुपये देण्यात येणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी ग्राम वन केंद्रात मोठ्या प्रमाणात गर्दी सुरु केली आहे. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतच सर्व्हर डाऊन ची समस्या उद्भवल्याने या योजनेबाबतही प्रश्नचिन्ह उभं राहात आहे.