बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात अनेक ठिकाणी शेकडो गतिरोधक अशास्त्रीयरित्या बसविण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे अनेकांनी जीव गमावला आहे. नुकताच अंगडी महाविद्यालयानजीक असलेल्या गतिरोधकामुळे एका तरुणाचा जीव गेला आहे. या गतिरोधकांसंदर्भात बेळगाव लाइव्हने वृत्त प्रकाशित केले होते. बेळगावमध्ये कित्येक ठिकाणी अशा पद्धतीचे जीवघेणे गतिरोधक बसविण्यात आले असून हे गतिरोधक शास्त्रीय पद्धतीने निर्माण करणे आवश्यक आहे. गतिरोधक नेमका कसा असावा याबाबत जनजागृती करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. गतिरोधकाच्या नियमांबाबत केवळ जनतेनेच नव्हे तर रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारांनीदेखील कोणत्या पद्धतीची दक्षता बाळगायला हवी?नियमानुसार, कायद्यानुसार गतिरोधक कशापद्धतीने असायला हवा याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
बेळगावातील अपघात, नागरिकांची जागरूकता, प्रशासनाची तत्परता या साऱ्या घटना बेळगावकरांसाठी स्वप्नवत आहेत. अपघात आणि खड्डे हे जरी नेहमीच्या सवयीचे असले तरीही प्रशासनाने दाखविलेली तत्परता हि आश्चर्यजनक आहे. आता बेळगावमधील नागरिक इतके जागरूक झालेच आहेत तर मग अशाच जागरूक नागरिकांसाठी ‘बेळगाव लाईव्ह’ च्या माध्यमातून आणखी एक महत्वपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
बेळगावमध्ये लागोपाठ झालेल्या दोन अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आणि तातडीने अनेक रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यात आले. गतिरोधकाचे काम सुरु असताना ५ दिवस काही रस्त्यांवरील वाहतूक बंद करून ती दुसऱ्या दिशेने वळविण्यात आली. मात्र, बेळगावमधील शाळा परिसरातील रस्त्यांसह इतर रस्त्यांवर घालण्यात आलेले गतिरोधक हे नियमानुसार आहेत का ? प्रत्येक रस्त्यावर स्पीडब्रेकर अर्थात गतिरोधक असणे आवश्यक आहे का? याबाबत IRC चे नियम कोणते आहेत? आणि या नियमानुसार बेगावमधील रस्त्यांवर गतिरोधक घालण्यात आले आहेत का ? याची पडताळणी नक्कीच झाली पाहिजे. नाहीतर नुसतीच आली लहर आणि केला कहर असे होता कामा नये. IRC च्या १९८७ च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्पीड ब्रेकर फक्त निवासी भागातील छोट्या रस्त्यांवर लावले जाऊ शकतात. वाहनांचा वेग कमी करण्यासाठी या स्पीड ब्रेकर्सची सोय केली जाते. याशिवाय मोठ्या रस्त्यांना छेद देणारे रस्ते, वाहनांची टक्कर टाळण्यासाठीही गतिरोधक बसविले जातात.
ज्या ठिकाणी शाळा, रुग्णालये, महाविद्यालये, शॉपिंग सेंटर्स, पोलीस स्टेशन किंवा विद्यापीठे आहेत, जेथे वाहतूक जलद गतीने होते, तिथे अपघाताची शक्यता कमी करण्यासाठी तसेच वाहतुकीचा वेग कमी करण्यासाठी या स्पीड ब्रेकर्सचा उपयोग होतो. हे स्पीडब्रेकर्स बसविण्यासाठी कोणत्या वैधानिक गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत याबद्दलदेखील IRC मध्ये तरतूद आहे. IRC नुसार स्पीड ब्रेकर ३.७ मीटर रुंदीचा आणि ०.१० मीटर उंचीचा गोलाकार आकारात असावा. ज्यामुळे वाहनांना जास्तीत जास्त २५ किमी प्रतितास वेगाने रस्ता ओलांडता करता येईल.
एक स्पीडब्रेकर आणि दुसऱ्या स्पीड ब्रेकरमधील अंतर किमान १०० ते १२० मीटर असावे. वाहनचालकांना स्पीड ब्रेकरच्या उपस्थितीबाबत आगाऊ सूचना फलकांच्या माध्यमातून देत सावध करण्यात यावे, गतिरोधकांपूर्वी चेतावणी चिन्ह गतिरोधक चिन्ह किंवा खडबडीत रस्त्यासारखे परिमाण असले पाहिजे. साइन बोर्डवर “स्पीड ब्रेकर” असे लिहिले पाहिजे. स्पीड ब्रेकरला काळ्या आणि पांढऱ्या पर्यायी पट्ट्या असायला हव्यात जेणेकरून रस्त्यावर गतिरोधकाचे अस्तित्व चालकाला पटकन लक्षात येईल.
बेकायदेशीर किंवा अनियोजित स्पीडब्रेकर सुरक्षेसाठी धोका तर बनतातच परंतु वाहतुकीत गोंधळाचे कारण बनू शकतात. अचानकपणे समोर आलेल्या गतिरोधकाजवळ खचकन ब्रेक मारणे यामुळे अपघाताची शकयता अधिक आहे. यामुळे केवळ वाहनाचेच नुकसान होत नाही तर जोराने आणि अचानक बसलेल्या धक्क्याने चालकाला मणक्याचे आजार होऊ शकतात. इंधनाची क्षमता वाढून प्रदूषण पातळी वाढते. वाहनांची वेगाने झीज होते. अचानक ब्रेक लावल्यामुळे दुचाकी वाहने स्किड होऊ शकतात. वेगवान रुग्णवाहिकेत रुग्णांना अचानक दणका बसून आरोग्यास गंभीर धोका होण्याची शक्यताही असते. याशिवाय अग्निशमन दल, पोलिस वाहन आणि रुग्णवाहिका यासारख्या आपत्कालीन वाहनांचा वेग कमी होतो. त्यामुळे नागरिकहो आता जागरूक झालाच आहात तर संपूर्णपणे जागे होऊन आपल्या परिसरातील गतिरोधक IRC नियमानुसार घालण्यात आले आहेत का? हे देखील नक्कीच पडताळून पहा.!
IRC च्या 1987 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्पीड ब्रेकरची रुंदी 3.7 मीटर आणि 0.1m उंचीसह 17m त्रिज्या असावी. वाहनाचा वेग २५ किमी प्रतितास कमी करण्यासाठी हे मोजले जाते. सीआरआरआय (सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट) सारख्या संस्थांनी वेगवेगळ्या वेगात स्पीड ब्रेकर्ससाठी कोड देखील आणला आहे.