‘बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या खासदार मंगला सुरेश अंगडी यांनी आज लोकसभेत वंदे भारत रेल्वे आणि पुणे इंटरसिटी रेल्वे बेळगावहून सुरु करण्यासंदर्भात आज मुद्दा उपस्थित केला.
हुबळी ते बेंगळुरू प्रमाणे बेळगाव-बेंगळुरू-बेळगाव या दरम्यान ‘वंदे भारत’ सेमी हायस्पीड ट्रेन सुरू करण्याबाबत तसेच बेळगाव ते पुणे आणि इंटरसिटी रेल्वे सेवा सुरु करण्याबाबत नागरिकांची मोठी मागणी होत आहे.
या पार्श्वभूमीवर काही उपाययोजना केल्या जात आहेत का? असा प्रश्न खास. अंगडी यांनी लोकसभेत उपस्थित केला.
यावर रेल्वेसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर देताना सध्या बेळगाव ते बेंगळुरू दरम्यान १५ रेल्वे सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल आहेत १६ रेल्वेसेवा बेळगाव ते पुणे दरम्यान प्रवाशांच्या सेवेत दाखल असल्याचे सांगितले.
वंदे भारत रेल्वे सेवा ही व्यवहार्यता, मागणी आणि संसाधनांची उपलब्धता इत्यादींच्या अधीन असल्याचे सांगितले. रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या या उत्तरामुळे वंदे भारत रेल्वेसेवेसाठी अद्यापही बेळगावला हिरवा कंदील देण्यात आला नसल्याचे चित्र दिसून येत आहे.