बेळगाव लाईव्ह : मान्सून अधिकच लांबल्याने आलमट्टी, मलप्रभा हिप्परगी आणि हिडकल जलाशयातील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी केला जावा अशी सूचना प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
आज गुरुवारी (६ जून) प्रादेशिक आयुक्त कार्यालयात आलमट्टी जलाशय, मलप्रभा प्रकल्प, घटप्रभा प्रकल्प आणि हिप्परगी प्रकल्प समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बोलाविण्यात आलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी विविध धरणातील पाणीसाठ्याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर पुढे बोलताना नितेश पाटील म्हणाले, सध्या बेळगाव जिल्ह्यातील हिरण्यकेशी नदीत अल्प प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.
परंतु घटप्रभा नदीवरील १४ बहु-ग्रामीण पेयजल प्रकल्पांपैकी बेळगाव जिल्ह्यातील हुलकुंद, सैदापुरा, अरकेरे, चिंचलकट्टी अनवला आणि बागलकोट जिल्ह्यातील कटगेरी बहु-ग्राम पेयजल प्रकल्प आधीच स्थगित आहेत. सिंचनासाठी सिंचन सल्लागार समिती किंवा शासनाची परवानगी घेता येईल, असे निर्देश प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी दिले.
सध्या बेळगाव जिल्ह्यातील हिरण्यकेशी नदीत अल्प प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली असून दिनांक ०७.०७.२०२३ रोजी घटप्रभा नदीची पाणीपातळी २००८.५ फूट होण्याची शक्यता आहे. हिरण्यकेशी नदीतून घटप्रभा नदीत येणाऱ्या पाण्याची आवक झाल्याने पाणीपातळी २००८.५ फुटांवर आल्यानंतर अतिरिक्त पाणी घटप्रभा नदीत सोडण्याचे निर्देश प्रादेशिक आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच सिंचनासाठी सिंचन सल्लागार समिती किंवा शासनाची परवानगी घेता येईल, असे निर्देश प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी दिले. यावेळी प्रादेशिक आयुक्तांनी अधिकाऱ्यांकडून बेळगाव विभागातील सात जिल्ह्यांतील पावसाचे प्रमाण आणि जलाशयांमध्ये किती पाणीसाठा आहे, याची माहिती घेतली.
या बैठकीला आलमट्टी जलाशय, मलप्रभा योजना, घटप्रभा योजना व हिप्परगी योजना समितीचे सदस्य सचिव, संबंधित अधीक्षक अभियंता, लघु पाटबंधारे विभाग आणि ग्रामीण पेयजल व स्वच्छता विभागाचे अधीक्षक अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.