यंदा जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र पिकांचे नुकसान होण्याबरोबरच कोरड्या पडलेल्या जमिनीसह निर्माण झालेली पाणी टंचाई लक्षात घेऊन सरकारने बेळगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अखंड कर्नाटक राज्य रयत संघाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
अखंड कर्नाटक राज्य रयत संघाचे तालुका अध्यक्ष बसवराज डोंगरगावी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना (डीसी) सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याच्या आश्वासन दिले.
दरवर्षी जून महिन्यात होणारे मान्सूनचे आगमन यंदा प्रदीर्घ लांबले आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याबरोबरच विहिरी, नदी -नाल्यांचे पाणी आटले आहे. सर्वत्र पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पेरणी केलेली बियाणे आणि खत नष्ट झाले आहे. शेतीसाठीचा वीज पुरवठा व्यवस्थित केला जात नाही.
वर्षभर पिक विमा भरून देखील शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळालेली नाही. एकंदर शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यामुळे सरकारने विमा कंपनीवरील शेतकऱ्यांचा विश्वास उडाला आहे. आजपर्यंत एकाही अधिकाऱ्याने गावात येऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या नाहीत. निवडून आलेले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यापैकी कोणीही शेतकऱ्यांची साधी चौकशी करायला आलेले नाही.
तेंव्हा या समस्यांची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. तसेच पावसाअभावी निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन बेळगाव तालुक्यासह संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा. याखेरीज शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई दिली जावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष बसवराज डोंगरगावी यांच्यासह अखंड कर्नाटक राज्य रयत संघाचे बसवराज हन्नीकेरी, शिखय्या परप्पणावर, महादेव अरगंजी आदी सदस्य उपस्थित होते.