बेळगाव लाईव्ह : यंदा मान्सून अतिशय लांबणीवर पडला असून बेळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांनीही तळ गाठायला सुरुवात केली आहे. जुलै महिना उजाडला तरी अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. पावसाच्या वाटेकडे आशेने डोळे लावून बसलेल्या प्रत्येकाकडून पावसाची प्रतीक्षा करण्यात येत आहे. मात्र जून महिन्यात केवळ पावसाचा शिडकावाच नागरिकांना अनुभवता आला आहे.
सध्या मान्सून लांबणीवर पडल्यामुळे हिडकल जलाशयातील पाणीसाठा देखील कमी झाला असून जलाशयाचे पात्र कोरडे पडू लागले आहे. या जलाशयाच्या आत असणाऱ्या श्री विठ्ठल मंदिराचा पुन्हा उगम झाला असून लांबलेल्या पावसामुळे साक्षात देवाला पाण्याबाहेर यावे लागले कि काय अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
हिडकल जलाशयातील पाणी साठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केल्यामुळे संपूर्ण वर्षभर जलाशयात बुडालेले भव्य असे श्री विठ्ठल मंदिर पुन्हा उदय पावले आहे. यंदा लांबलेल्या मान्सूनमुळे गावकरी आणि पर्यटक अशा दोघांनाही थेट मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.
हिडकल जलाशयाचे बांधकाम गेल्या 1977 मध्ये जेंव्हा पूर्ण झाले, तेंव्हा त्याच्या पाण्याने हिडकल आणि हुन्नूर ही दोन गावे गिळंकृत केली. विशेष म्हणजे जलाशयाच्या ठिकाणी असलेले श्री विठ्ठल मंदिर मात्र तब्बल 45 वर्षे पाण्याखाली बुडालेले राहून देखील आश्चर्यकारकरीत्या अबाधित राहिले. या विठ्ठल मंदिराच्या काळ्या दगडांच्या भव्य दर्शनीय भागाचे बांधकाम 12 व्या आणि 13 व्या शतकातील प्रख्यात वैशिष्ट्यपूर्ण अशा हेमाडपंथी वास्तुशिल्पकलेचा अविष्कार घडवते.
पाण्यात बुडवून राहिल्यामुळे कालांतराने मंदिराच्या उंच रचनेच्या बाह्य भिंतींचे नुकसान झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात जलाशयाचे पाणी कमी झाले की या मंदिराचे दर्शन घडत असते. मात्र यंदा मान्सूनच्या पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यामुळे श्री विठ्ठल मंदिर पूर्णपणे पाण्याबाहेर येऊन भक्तमंडळी आणि पर्यटकांना थेट मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.
हिडकल जलाशयातील विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आज शांताई वृद्धाश्रमाच्या आजी – आजोबांसोबत वृध्दाश्रमाचे कार्याध्यक्ष विजय मोरे यांनी हिडकल जलाशयाचा दौरा आखला. तब्बल ४०-४५ वर्षानंतर उगम पावलेल्या या मंदिरातील विठ्ठलाचे दर्शन घेऊन वृध्दाश्रमाच्या आजी आजोबांनी समाधान व्यक्त केले. यंदाच्या लांबलेल्या मान्सूनमुळे सर्वत्र पाणी टंचाईचे सावट पसरले आहे.
अनेक ठिकाणी पाणी समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असून भविष्यात अशा प्रकारची समस्या उद्भवू नये यासाठी प्रत्येकाने झाडे लावा, झाडे जगवा, पाणी आडवा पाणी जिरवा असे उपक्रम सातत्याने करणे गरजेचे आहे असे मत माजी महापौर विजय मोरे यांनी व्यक्त केले. यावेळी विजय मोरे यांच्यासह वसंत बालिगा, विनायक जैनोजी, लक्ष्मण चौगुले, विनायक पाटील, शॅरेल मोरे, मारिया मोरे, विजया पाटील आदी उपस्थित होते.
हिडकल जलाशयातील श्री विठ्ठल मंदिर पाण्याबाहेर विजय मोरेंनी घडवून शांताई मधील आजी आजोबांना या विठुरायाचे दर्शन |BELGAUM LIVE| pic.twitter.com/Y5agE3ArDc
— Belgaumlive (@belgaumlive) July 4, 2023