बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये अलीकडे अनेक विकासकामे राबविण्यात आली असून यादरम्यान नागरिकांच्या मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात संपादन करण्यात आले आहे.
बेळगावमध्ये विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या विकासकामांतर्गत रस्ता रुंदीकरण करण्यात आले असून यामध्ये शहापूर येथील बँक ऑफ इंडिया ते जुना पी. बी. रोड येथेही रस्ता रुंदीकरण करण्यात आले.
याठिकाणी ८० फूट रस्ता रुंदीकरण करण्यात आले असून या रुंदीकरणासाठी काढण्यात आलेल्या सीडीपी आणि रस्ता रुंदीकरणात तफावत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते राजकुमार टोपन्नावर यांनी केला आहे. शिवाय हा रस्ता भाजप नेत्याच्या कार्यालयाला जोडला जावा या हेतूने बेकायदेशीर रित्या रुंदीकरण करण्यात आल्याचा आरोपही टोपन्नावर यांनी केला आहे.
शहपूर येथील बँक ऑफ इंडिया ते जुन्या पी.बी. रस्त्याच्या रुंदीकरणात अनेक त्रुटी आहेत. रस्ता रुंदीकरणाचा अनुभव बेळगाव महानगरपालिकेला असणे गरजेचे आहे. स्मार्ट सिटीतील अनुदान वाढले असल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी हवे तसे काम केल्याचे याठिकाणी दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पीएमसी ट्रॅक बेल इंडिया स्मार्ट सिटीच्या प्रत्येक कामाची ब्लू प्रिंट तयार करते. त्यामुळे बेळगाव स्मार्ट सिटी लि. दक्षिण विभागाच्या कार्यकारी संचालक अजित पाटील आणि तत्कालीन स्मार्ट सिटीचे एमडी यासाठी थेट जबाबदार असून रस्त्याच्या रुंदीकरणात ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी टोपाण्णावर यांनी केली आहे.