यंदा पावसाने दडी मारल्यामुळे बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाने तळ गाठण्यास सुरुवात केली असून सध्या जलाशयाच्या तळातील शेवटच्या तिसऱ्या व्हाॅल्व ठिकाणी फक्त अर्धा फूट पाणी शिल्लक राहिले आहे.
ज्यामुळे यापुढे पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता आहे. या समस्येवर मात करण्यासाठी यापूर्वी पाण्यात सोडलेल्या 50 हॉर्स पॉवरच्या मोटारीसह आता जलाशयातील पाण्याच्या मृत साठ्यातून (डेडस्टॉक) पाणी उपसा करण्याची तयारी करण्यात आली आहे.
मागील वर्षी याच दिवसांमध्ये राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली होती आणि पुरेसा पाणी साठा असल्यामुळे पुरवठ्यात टंचाई देखील निर्माण झाली नव्हती. तथापि यंदा जूनचा मध्यवधी आला तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे जलाशयाची पाणी पातळी अतिशय खालावली असून ज्यामुळे शहरवासीयांसमोर पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
सध्याच्या घडीला शहर आणि उपनगरात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जात आहे, तर कांही ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांना त्याहून जास्त काळ वाट पहावी लागत आहे.
राकसकोप जलाशयाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच गत 2019 मध्ये पाणीपुरवठा मंडळाने शहरातील पाणी पुरवठ्यासाठी डेड स्टॉकमधील पाण्याचा वापर केला होता. त्यासाठी तीन वीज मोटारी वापरण्यात आल्या होत्या. त्यावर्षी 29 जूनपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे डेड स्टॉक मधील 6 फूट पाणी उपसा करत शहराला पाणीपुरवठा करण्यात आला होता. यंदा हिडकल जलाशयाच्या पाणी पातळीतही कमालीची घट झाली आहे.
राकसकोप जलाशय तळ गाठण्याच्या तयारीत असले तरी डेड स्टॉक मधील पाण्याच्या राखीव साठ्यामुळे शहराला अजून किमान 10 ते 15 दिवस शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो. आता केवळ मान्सूनच बेळगावला पाणी टंचाईतून वाचवू शकतो. जर पावसाने अजून कांही दिवस दडी मारली तर मात्र बेळगावकरांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.