बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयातची पातळी पावसाअभावी चिंताजनक घट झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत जलाशयात 6 फूट कमी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या या जलाशयाची पाणी पातळी जवळपास 2448.85 फूट इतकी आहे.
राकसकोप जलाशय परिसरात दरवर्षी दमदार पाऊस पडतो. मान्सून वेळेत सुरू झाला की जलाशयाची पातळी झपाट्याने वाढते. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा या जलाशय परिसरात निम्माच पाऊस झाला आहे.
मान्सूनचे आगमन देखील लांबले आहे. गतवर्षी 15 जून पर्यंत राकसकोप जलाशय परिसरात 276.8 मि.मी. पाऊस झाला होता. मात्र यंदा अवघा 135.1 मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा पाऊस निम्म्याने कमी असून त्यामुळे जलाशयाच्या पाणी पातळीत चिंताजनक घट झाली आहे. मागील वर्षी राकसकोपची पातळी 2454.60 फूट होती ती सध्याच्या घडीला 2448.85 फूट इतकी आहे. थोडक्यात जलाशयातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा 6 फुटाने कमी आहे.
जलाशयाची पाणी पातळी 4446 फुटावर आल्यास पाण्याच्या मृतसाठ्यातून उपसा करावा लागणार आहे. शहराची पाणीपुरवठा व्यवस्था सांभाळणाऱ्या एल अँड टी कंपनीने त्याची तयारी केली आहे. सध्या 50 एचपी क्षमतेच्या दोन मोटारी जलाशयात सोडण्यात आल्या आहेत. पाणी पातळी आणखी खालावली तर या मोटारींद्वारे उपसा सुरू केला जाणार आहे.