Sunday, October 6, 2024

/

मराठी शाळा टिकविण्यासाठी धडपडणारे : मोहन हरजी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याचा टिकाव लागण्यासाठी आज अनेक पालक मातृभाषा सोडून इंग्रजी माध्यमात आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत. मातृभाषेतून शिक्षण दिलं कि पुढील प्रवास अवघड होतो असा काहींचा समज आहे. मात्र मातृभाषेतून शिक्षण घेत, सरकारी शाळेत शिक्षण पूर्ण करून आजवर अनेकांनी यशाचे सर्वोच्च शिखर गाठले आहे.

हल्ली मराठी शाळा आणि त्यातूनही सरकारी शाळेतील पटसंख्या कमी होत चालली असून अशा शाळा टिकविण्यासाठी समाजातील अनेक भाषा, संस्कृतीप्रेमी आणि जबाबदार नागरिक पुढाकाराने कार्य करत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सांबरा या गावचे मोहन हरजी!

सांबरा येथे सरकारी शाळा टिकविण्यासाठी मोहन हरजी सातत्याने प्रयत्न करत आहेत. सांबरा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी मोहन हरजी आणि शाळा सुधारणा समितीचे सर्व सदस्य अहोरात्र कार्य करत आहेत. हल्ली पालकांमध्ये निर्माण झालेली इंग्रजी माध्यमाची क्रेझ पाहता सरकारी शाळा ओस पडत आहेत. या पार्श्वभूमीवर कित्येक वर्षांपासून सरकारी मराठी शाळा टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मोहन हरजी सर्वांना आपल्या समवेत घेऊन प्रयत्न करत आहेत.Mohan harji

इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी शाळा सुधारणा कमिटीच्या सदस्यांसह घरोघरी जाऊन कागदपत्रे जमा करणे आणि पालकांना मराठी शाळेत पाल्यांना शिक्षण देण्यासाठी विनंती करणे, मातृभाषेतून मिळणाऱ्या शिक्षणाचे महत्व पटवून सांगणे आणि यासह अनेक उपक्रम राबवून पालक आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे कार्य मोहन हरजी यांच्या माध्यमातून केले जात आहे.

प्रत्येक रविवारी शाळेची साफसफाई करणे, वृक्षारोपण करणे, शाळेच्या इतर गरजांकडे लक्ष देत त्या पुरविण्यासाठी प्रयत्न करणे असे अनेक उपक्रम मोहन हरजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहेत. सोशल मीडियामुळे हल्ली अनेक शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा भरविण्यात येत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या अस्तित्वाचे महत्व पटवून देत शाळेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

सांबरा येथील सदर शाळेत गेल्या १५ वर्षांपासून मुख्याध्यापकांची जागा रिक्त आहे. याठिकाणी इनचार्ज मुख्याध्यापकांच्या माध्यमातून शाळा सुरु असून यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी, डीडीपीआय, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत अशा अनेक ठिकाणी निवेदने देण्यात आली आहेत. मुख्याध्यापकांसह या शाळेत आणखी दोन शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. मात्र या जागांवर भरती करण्याकडे प्रशासन आणि शिक्षण विभाग दुर्लक्ष करत आहे. सीमाभागात मराठीला नेहमीच डावलले जाते आणि याचप्रमाणे सांबरा येथील मराठी शाळेकडे देखील दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार मोहन हरजी यांनी सांगितली. अशा समस्या असूनही हि शाळा टिकविण्यासाठी मोहन हरजी आणि त्यांचे सहकारी अहोरात्र प्रयत्न करत असून लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग आणि प्रशासनाने अशा शाळांकडे कटाक्षाने लक्ष पुरवून शाळा सुधारण्यासाठी आणि पटसंख्या वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण द्यावे, शालेय इमारत, मुलांना पुरविण्यात येणारे शालोपयोगी साहित्य अशा सर्व गोष्टींमध्ये सकारात्मक पद्धतीने लक्ष पुरवावे आणि सरकारी शाळा टिकविण्यासाठी हातभार लावावा असे मत मोहन हरजी यांनी व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.