राज्यातील काँग्रेस सरकारने धर्मांतर बंदी कायदा रद्द केल्याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शने करत भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे आज शनिवारी सकाळी काढण्यात आलेल्या मोर्चाला राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून प्रारंभ झाला. मोर्चादरम्यान जय श्रीराम जय जय श्रीराम, बोलो भारत माता की जय या घोषणांसह काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चाच्या अग्रभागी हिंदू स्वामीजी आणि विहींपी व बजरंग दलाचे नेते उपस्थित होते. हातात ओम हे चिन्ह असलेले भगवे ध्वज घेऊन जोरदार घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. सदर मोर्चाची कोर्ट रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सांगता झाली त्या ठिकाणी विहींप आणि बजरंग दलाच्या नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. धर्मांतर बंदी कायदा रद्द करू नये. तसेच हिंदू विरोधी कायदे अंमलात आणू नयेत या संदर्भातील तपशील निवेदनात नमूद आहे. आजच्या या भव्य मोर्चात बेळगाव शहर आणि जिल्ह्यासह कोल्हापूर वगैरे परगावातील विहींप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चेकर्यांमध्ये महिला आणि युवतींचाही लक्ष्मी समावेश होता
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना बजरंग दलाचे जिल्हा संयोजक म्हणाले की, काँग्रेस सरकारने धर्मांतर बंदी कायदा मागे घेतला आहे. त्यामुळे यापुढे असंख्य हिंदूंना धर्मांतर करून मुसलमान अथवा ख्रिश्चन बनविले जाण्याची शक्यता आहे. असे विपरीत घडू नये यासाठी संपूर्ण कर्नाटकात आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे राज्यव्यापी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. सरकारला माझं एकच सांगणं आहे की कित्येक हिंदू लोकांनी तुम्हा 135 जणांना निवडून दिले ते धर्मांतर कायदा रद्द करणे गोहत्या बंदी मागे घेणे यासाठी नव्हे तर जनतेच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी निवडून दिले आहे. हिंदू धर्माविरोधात अनेक कायदे अंमलात आणले जात आहेत हे खपवून घेतले जाणार नाही. काँग्रेसने राज्यात 135 जागा जिंकल्या त्या फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांमुळे नव्हे तर हिंदूंचाही त्यात सिंहाचा वाटा आहे. ज्या संघटनांवर बंदी घालण्याची काँग्रेसने मागणी केली होती. त्याच संघटनांनी काँग्रेसच्या विजयास हातभार लावला आहे असे असताना सरकार हिंदूंच्या विरोधात कायदे काढत आहे हे ठीक नाही आणि याचा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जाहीर निषेध करते.
एका महिला कार्यकर्त्याने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना जगात फक्त भारत हा एकच देश आहे जिथे हिंदूंची सत्ता आहे. तेंव्हा या देशात राहायचे असेल तर हिंदू तत्वांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र तसे घडण्याऐवजी धर्मांतर बंदी कायदा रद्द करणे, गोहत्या बंदी कायदा मागे घेणे यासारखी हिंदू विरोधी कृत्ये सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहेत हे दुर्दैवी आहे.
देशभरात लव जिहादचे विष पसरत आहेत. आज आमच्या माता -भगिनी सुरक्षित नाहीत. या परिस्थितीत कर्नाटक सरकारने धर्मांतर कायदा रद्द केला हे अन्यायकारक आहे. छ. शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म रक्षणासाठी स्वराज्य स्थापन केले होते. धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मासाठी स्वतःचे बलिदान दिले, हे लक्षात घेतले पाहिजे असे सांगून तेंव्हा हिंदू धर्मावर गंडांतर आले तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्या महिला कार्यकर्त्याने दिला.