Saturday, April 27, 2024

/

पोलिसांकडून वाहतूक रोखणे : सार्वजनिक सुविधेची उघड अवहेलना

 belgaum

अति महनीय व्यक्तींचा संचार, मोर्चे, मिरवणुका आदींसाठी रस्त्यांवरील वाहतूक अवास्तव रोखण्याच्या कृतीमुळे अलीकडे बेळगावच्या पोलीस खात्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. त्यातून एक वास्तव समोर आले आहे ते हे की पोलिसांनी वाहतूक रोखून धरण्याच्या या प्रकारामुळे अजित पाटील नामक एका नागरिकाला कोर्टाच्या सुनावणीला मुकावे लागले. परिणामी त्यांनी माहिती हक्क अधिकाराचा अवलंब केला. त्यातून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार धक्कादायक सत्य समोर आले ते म्हणजे सार्वजनिक रहदारीचे महत्त्वपूर्ण केंद्र असलेल्या बेळगाव शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे गेल्या जानेवारी 2022 आणि एप्रिल 2023 मध्ये विविध मोर्चे, मिरवणुका आणि राजकीय कार्यक्रमांसाठी एकूण 50 वेळा वाहतूक रोखून धरण्यात आली होती.

चिंतेची बाब ही आहे की अजित पाटील यांना माहिती हक्क कायद्याखाली उपलब्ध झालेली माहिती ही फक्त महत्त्वाच्या अधिकृत मिरवणूक, मोर्चांसंदर्भात होती. त्यामध्ये दररोज असंख्य वेळा कायदेशीर परवानगी नसताना थोडक्यात कोणतीही कल्पना न देता अचानक जी आंदोलन होतात, ज्यामुळे वाहतूक रोखली जाते त्याचा उल्लेख नाही. परिणामी जनतेच्या हित संरक्षणासाठी असलेल्या पोलीस खात्याला जनतेसाठी सुलभ सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देता येत नाही का? या प्रश्नांसह बेळगाव रहदारी पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबतचा गंभीर प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. मोर्चा, मिरवणुका अथवा अतिमहणीय व्यक्तींची ये -जा यासाठी प्रमुख रस्त्यांसह त्याला जोडणाऱ्या अन्य रस्त्यांवरील वाहतूक पोलिसांकडून रोखून धरणे हे कांही शहरवासीयांना नवीन नाही. तथापी मिरवणुकीने नामांकन भरण्यासाठी जाणारे राजकीय उमेदवार, शहरात दाखल होणाऱ्या अतिमहणीय व्यक्ती किंवा वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी रस्त्यांवरील वाहतूक रोखून धरण्याचा प्रकार सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वसामान्य नागरिकांसाठी मनस्ताप देणारा ठरत आहे. सदर प्रकारामुळे नागरिकांच्या दैनंदिन दिनचर्याला बाधा तर पोहोचतच आहे. त्याखेरीस आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्यांसाठी ही बाब मोठे नुकसान करणारी एखाद्याच्या जीवितावर बेतणारी ठरू पाहत आहे. बऱ्याचदा पोलिसांनी वाहतूक रोखल्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यास विलंब लागतो. ज्यामुळे संबंधित रुग्णाची प्रकृती अधिकच बिघडण्याची अथवा काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. मात्र संबंधित रुग्णाच्या कुटुंबीयांचा समजूतदारपणा, माणुसकी यामुळे त्या घटना विशेष चर्चेत आल्या नाहीत.

आज-काल अतीमहनीय व्यक्तींसाठी शहरात सुरळीत सुरू असलेली वाहतूक रोखून ती विस्कळीत करणे हे संबंधित व्यक्तीच्या सन्मानाचे प्रतीक मानले जाते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य जनतेचे किती हाल होतात त्यांचे किती नुकसान होते याचे आत्मपरीक्षण संबंधित अतिमहणीय व्यक्तींसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी करणे गरज आहे. खरे तर अतिमहणीय व्यक्तींनी सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही या पद्धतीने समाजातील आपला वावर राहील याची दक्षता घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन अर्थात रहदारी पोलिसांनी देखील रहदारी रोखताना सर्वसामान्य जनतेला कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेतली पाहिजे. सध्याची एकंदर परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची आणि वाहतूक रोखण्याच्या आपल्या कृतीचा पुनर्विचार करण्याची वेळ आली असल्याचे मत जाणकार नागरिकांतून व्यक्त होत आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.