Saturday, October 5, 2024

/

सराफ कॉलनीतील आठ झाडांवर कुऱ्हाड!

 belgaum

एकीकडे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आधीचा सावळा गोंधळ संपुष्टात आणून शहरासह जिल्ह्याची घडी व्यवस्थित बसवण्यास सुरुवात केली असताना दुसरीकडे शहरातील झाडांची कत्तल करण्याची वनखात्याच्या कंत्राटदारांची मनमानी अद्यापही सुरूच आहे. आज या कंत्राटदारांनी सराफ कॉलनी, टिळकवाडी येथील झाडांना लक्ष्य केल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

खानापूर रोड टिळकवाडी लगत असणाऱ्या सराफ कॉलनीमध्ये आज सकाळपासून रस्त्या शेजारी असलेली झाडे तोडण्याचे सत्र सुरू झाले आहे. एकही झाड कमकुवत, जीर्ण कोसळण्याच्या अवस्थेत नसताना या ठिकाणची रस्त्या शेजारील चांगली बहरात असलेली झाडे तोडण्यात येत आहेत.

सदर प्रकार निदर्शनास येतात सामाजिक कार्यकर्ते व वृक्षप्रेमी वरूण खासणीस यांनी संबंधित कंत्राटदाराला जाब विचारला. कारण एखादे झाड कमकुवत, जीर्ण धोकादायक झाले असेल तर ते तोडण्यासाठी वनखात्याची परवानगी लागते. खासणीस यांनी जाब विचारताच संबंधित कंत्राटदाराने आपल्याला सराफ कॉलनीतील 8 झाडे जीर्ण झाल्यामुळे ती तोडण्याचे टेंडर, परवानगी वनखात्याने दिली असल्याचे सांगितले. मात्र तसा अधिकृत पुरावा सादर करण्यास त्याने टाळाटाळ केली.Trees cut

मिळालेल्या माहितीनुसार अत्यंत दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे घडत असताना सराफ कॉलनीतील एकही रहिवाशी निष्कारण झाडे तोडू नका असा विरोध करत वृक्षप्रेमी वरूण खासणीस यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. त्याचप्रमाणे असे समजते की, सदर कॉलनीतील एक झाड धोकादायक असल्यामुळे त्याबाबतची तक्रार करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात आज सराफ कॉलनीतील 8 झाडांची कत्तल करण्यात येत आहे. हा प्रकार पाहून संपूर्ण शहराच्या तुलनेत बेळगाव दक्षिण मतदार संघातील वृक्षराई धोक्यात आल्याचे चर्चा होत असून या भागाचे आमदार झाडांच्या कत्तलींना आणखी किती वर्षे असाच पाठिंबा देत राहणार असा संतप्त सवाल केला जात आहे.

त्याचप्रमाणे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्हॅक्सिन डेपो येथील वृक्षतोडीला लगाम घातला असला तरी या भागातील अन्य वृक्षांच्या हिताच्या दृष्टीने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.