बेळगाव लाईव्ह : काही तांत्रिक अडचणींमुळे वंदे भारत रेल्वे सध्या तरी बेळगावपर्यंत पोहोचू शकत नसल्याची माहिती राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी आज (शुक्रवारी) शहरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.
धारवाड मार्गावर ताशी ११० कि.मी. वेगाने धावणाऱ्या या रेल्वेला बेंगलोरपासून आपल्या मुक्कामाला पोहोचण्यास ६:३० तास लागतात. तथापि या रेल्वेचा वेग १३० कि.मी. पर्यंत वाढवून हा प्रवास ४:३० तास इतका कमी करण्याची योजना आखली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कडाडी पुढे म्हणाले की, खरे तर वंदे भारत रेल्वे धारवाड ओलांडून बेळगावपर्यंत येणार होती. मात्र दुर्दैवाने त्याच वेळी रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे ती बेळगावपर्यंत पोहोचू शकली नाही. त्याचप्रमाणे धारवाड आणि बेळगाव दरम्यान एका ठिकाणी रेल्वे मार्ग वळणदार असल्यामुळे प्रतितास ११० कि.मी. या इच्छित वेगाने ही रेल्वे बेळगावला पोहोचणे अवघड आहे. त्यामुळे सदर रेल्वे बेंगलोर ते बेळगाव आणि पुन्हा त्याच दिवशी परतीच्या प्रवासावर निघणे सध्या तरी शक्य नाही.
सकारात्मक बाब ही म्हणजे लोंढा ते बेळगाव दरम्यानची रेल्वे मार्ग विद्युतीकरणाची प्रक्रिया जवळपास समाप्त होत आली असून येत्या १० दिवसात ती पूर्ण होईल. खासदार मंगला अंगडी यांनी वंदे भारत रेल्वे संदर्भात थेट केंद्रीय रेल्वेमंत्र्यांशी चर्चा केली आहे.
रेल्वेमंत्र्यांनी लोंढा बेळगाव मार्गावर सध्या तरी वंदे भारत रेल्वे धावू शकणार नाही याला दुजोरा दिला आहे, अशी माहिती राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी दिली.
या पत्रकार परिषदेस खासदार मंगला अंगडी यांच्यासह भाजपचे अन्य नेते व पदाधिकारी उपस्थित होते.