पावसाळ्याचे आगमन लांबल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यासाठी आता सर्व तहसीलदार आणि स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची बैठक बोलावून हाती घ्यावयाच्या उपाययोजना आणि आवश्यक अनुदानासंदर्भात प्रस्ताव सरकारला पाठवावा लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील लोक आणि जनावरांना मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर हाती घ्यावयाच्या उपाय योजना संदर्भात आज सोमवारी आयोजित अधिकाऱ्यांसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी (डीसी) बोलत होते.
टास्क फोर्स बैठक घेण्याबरोबरच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील समस्यांची पाहणी करून आपत्कालीन कार्य सुरू करावे आणि आवश्यक अनुदानाचा प्रस्तावही तयार ठेवावा. या प्रस्तावांआधारे सरकारकडे बेळगाव जिल्ह्यासाठीच्या आवश्यक अनुदानाचा प्रस्ताव पाठविला जाईल, असे सांगून उपलब्ध अनुदानातून आमदारांच्या सल्ल्यानुसार आवश्यक उपाययोजना सुरू केल्या जाव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आपत्कालीन कामे हाती घेण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा खात्याला पुरेसे अनुदान मिळत असते. मात्र तरीही प्रत्येक तालुक्याला जास्तीत जास्त अनुदान मिळेल यासाठी प्रयत्न केला जाईल. जिल्ह्यात सर्वत्र पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याची निदर्शनास आले आहे.
यासाठी तहानलेल्या लोकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सर्व तहसीलदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्याधिकाऱ्यांना केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला ग्रामीण पाणी पुरवठा खात्याचे अधिकारीही उपस्थित होते.