सरकारी हॉस्टेल आणि वसती शाळेत काम करणाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन नोकरीत कायम करावे या मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कर्नाटक राज्य सरकारी हॉस्टेल आणि वसती शाळा कंत्राटी नोकर संघाच्या बेळगाव शाखेतर्फे जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
सरकारी हॉस्टेल्स आणि वसती शाळांमध्ये स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी, वॉचमन, प्युन आणि स्वच्छता कर्मचारी या पदांवर गेली अनेक वर्ष कार्य करणाऱ्या स्त्री -पुरुष कामगारांनी कर्नाटक राज्य सरकारी हॉस्टेल आणि वसती शाळा कंत्राटी नोकर संघाच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चामध्ये संबंधित कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चाने आलेल्या या कामगारांनी आपल्याला सरकारी नोकराचा दर्जा देऊन नोकरीत कायम करावे या मागणी प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांच्या नावे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांकडे सादर केले.
गेली अनेक वर्षे काम करूनही आम्हाला अद्यापही नोकरीत कायम करण्यात आलेले नाही. या खेरीज दररोज 12 ते 14 तास काम करून देखील पगारही जास्त दिला जात नाही. कामगार खात्याने आम्हाला कनिष्ठ वेतन देण्याचा आदेश दिला आहे. मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही सर्वोच्च न्यायालयाने देखील कामाच्या स्वरूपानुसार सरकारी नियमाप्रमाणे आम्हाला वेतन द्यावे असे निर्देश दिले आहेत. तथापि त्या निर्देशाचेही पालन केले जात नाही अशी तक्रार यावेळी एका कामगार नेत्याने केली.
तसेच आम्हाला सरकारी नोकराचा दर्जा देऊन नोकरीत कायम करावे अन्यथा 60 वर्षापर्यंत नोकरीची हमी द्यावी. ईएसआय, पीएफ वगैरे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या सुविधा आम्हालाही लागू कराव्यात अशा आमच्या कांही मागण्या आहेत, असेही त्याने स्पष्ट केले.