बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी मुख्य वास्तुविशारद आर. श्रीधर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (3 जून) शहराच्या मध्यभागी असलेल्या शासकीय कार्यालयांसाठी सुसज्ज बहुमजली इमारतीच्या बांधकामासंदर्भात स्थळ पाहणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय, काडा, उद्यान, उपनिबंधक कार्यालय, अल्पबचत, वाचनालय, लोकायुक्त, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका पंचायत यासह विविध कार्यालये मोकळे करून त्याच ठिकाणी बहुमजली इमारत बांधण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध कार्यालये एकाच छताखाली आणून पुरेशा पार्किंगसह सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
जिल्ह्याच्या विकासाबाबत नुकत्याच सुवर्ण विधान सौध येथे झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री महोदयांनी बहुमजली इमारत बांधण्याबाबत प्राथमिक चर्चा केली होती व त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करण्याचे सांगितले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य वास्तुविशारद यांच्या नेतृत्वाखालील पथक शहराचा दौरा करणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी मुख्य वास्तुविशारद आर.श्रीधर यांनी प्रस्तावित बहुमजली इमारतीच्या गरजा, आराखडा व इतर समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप वास्तुविशारद श्रीमती आशा, बेळगावचे कार्यकारी अभियंता एस.एस.सोबरद, कार्यकारी अभियंता सुभाष नायक, रमेश मैत्री आदी उपस्थित होते.