Saturday, November 9, 2024

/

शिवरायांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

 belgaum

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती, श्रीराम सेना हिंदुस्तान तसेच अन्य संघटनांतर्फे आज मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक दिन शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्याद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.

एसपीएम रोड शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यान मध्ये आज सकाळी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, समितीचे युवानेते व श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर आदी मान्यवरांच्या हस्ते उद्यानातील सिंहासनारूढ पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. तसेच आरती करून शिवरायांना आदरांजली वाहण्याबरोबरच अभिवादन करण्यात आले.

आरती नंतर पुण्यश्लोक छ. शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी असा महाराजांचा जयजयकार करण्यात आला. याप्रसंगी प्रकाश मरगाळे, समितीचे जनसंपर्कप्रमुख विकास कलघटगी, ॲड. अमर येळ्ळूरकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, मदन बामणे आदींसह समितीचे बहुसंख्य कार्यकर्ते आणि शिवभक्त उपस्थित होते.

शिवपूजनानंतर बेळगाव लाईव्हशी बोलताना शिवरायांना आपले दैवत मानणारे युवा नेते रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, आजच्या परिस्थितीत आपण सर्वांनी शिवरायांना स्मरून त्यांच्या विचारधारेनुसार कार्य केले पाहिजे. आपला समाज शिवरायांच्या विचारांना अनुसरून न वागता आज कुठेतरी भरकटात चालला आहे. विशेष करून आपली युवा पिढी भरकटत चालली आहे. माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी पुण्यश्लोक शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने 18 पगड जातीच्या लोकांना संघटित करून स्वराज्य स्थापन केले त्या संघटित विचारधारेचे महत्त्व आणि ताकद लक्षात घेतली पाहिजे.

महाराजांच्या विचारानुसार माझ्या समाजाने एकत्रित येणे काळाची गरज आहे. आपण शिवरायांच्या समाजातील असूनही अलीकडे आपल्यात विस्कळीतपणा आला आहे. परिणामी आज अन्य कोणीतरी येऊन आपल्यावर राज्य करू पाहत आहे, हे आपण थांबवले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी शिवरायांची विचार आत्मसात केले पाहिजेत असे सांगून शिवरायांच्या विचारातून कार्य करणे काळाची गरज आहे आणि माझ्या सर्व समाज बांधवांनी तसेच करावे अशी माझी विनंती आहे, असे कोंडुसकर म्हणाले.Shivrajyabhishek

युवा नेते ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवरायांनी स्वराज्याची संकल्पना भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार आणि समान न्याय या तत्त्वावर प्रत्यक्षात उतरवली. थोडक्यात 350 वर्षांपूर्वी पुण्यश्लोक छ. शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने हिंदुस्तानात लोकशाहीची नांदी देऊन तिचा पाया घातला. मात्र दुर्दैवाने आता 350 वर्षानंतर देखील या देशात राहणाऱ्या आम्हा सीमाभागातील मराठी बांधवांना लोकशाहीचे समान अधिकार मिळत नाहीत. हे अधिकार जर मिळत नसतील तर स्वराज्याच्या संकल्पनेनुसार आपल्याला ते अधिकार मिळवावे लागणार आहेत आणि त्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. महाराजांनी जेंव्हा स्वराज्य स्थापन केले त्यावेळी जनतेला त्यांच्या -त्यांच्या भाषेतून राज्यकारभार समजावा अशी तरतूद केली होती. त्यासाठी महाराजांनी मराठी राज्य कोषाची निर्मिती केली.

तो मराठी राज्यकोष त्याकाळी प्रत्येक माणसाला न्याय देण्यास कारणीभूत ठरला होता. मात्र आज 350 वर्षानंतर विपरीत परिस्थिती आहे. सीमाभागात आम्हा मराठी भाषिकांना अजूनही आपण गुलामीत जगतोय असे वाटते यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. ज्या आमच्या महाराजांनी आम्हाला आमच्या मातृभाषेतून बोलण्याचा, व्यवहार करण्याचा अधिकार दिला होता तोच अधिकार आज आमच्याकडून हिरावून घेतला जात आहे. तेंव्हा मातृभाषेतून सरकारी व्यवहार करण्यापासून वंचित ठेवणाऱ्या कायद्याविरोधात आपण सर्वांनी संघटितपणे संघर्ष करणे गरजेचे आहे असे ॲड. येळ्ळूरकर यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.