Tuesday, April 23, 2024

/

रिंगरोडसाठी देणार नाही जमीन -येळ्ळूरच्या शेतकऱ्यांचा निर्धार

 belgaum

झाड शहापूर येथील शेतकऱ्यांमागोमाग येळ्ळूर भागातील शेतकऱ्यांनी देखील बेळगाव शहराच्या रिंग रोडला तीव्र विरोध केला आहे.

येळ्ळूरच्या शेतकऱ्यांनी आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमोर रिंग रोडसाठी कोणत्याही परिस्थितीत आपल्या सुपीक जमीन देणार नसल्याचा निर्धार व्यक्त करून तसे स्पष्टीकरण दिले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या आवाहनानुसार बेळगाव रिंगरोडसाठी जमीन संपादित होणाऱ्या गावातील शेतकऱ्यांकडून रिंग रोड बाबत मत जाणून घेऊन आक्षेप नोंदवून घेतले जात आहेत.

 belgaum

त्या अनुषंगाने आज येळ्ळूर आणि परिसरातील शेतकऱ्यांना शहरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी येळ्ळूर भागातील शेतकऱ्यांनी रिंग रोड योजना अंमलबजावणीस तीव्र आक्षेप घेतला. बेळगावच्या रिंग रोडमुळे येळ्ळूर येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येळ्ळूर भागातील जमीन ही अत्यंत सुपीक असून या जमिनीमध्ये आम्ही शेंगा, बटाटा, भात, ऊस अशी विविध पिके घेतली जातात. याखेरीस जनावरांसाठी चारा देखील या जमिनीतूनच उपलब्ध होत असतो.

भाऊबंदकी व अन्य कारणास्तव आम्हा शेतकऱ्यांकडे शेतीसाठी आधीच अत्यल्प जमीन आहे. त्या जमिनीतून मिळणाऱ्या शेतीच्या उत्पन्नावर आमचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे आमच्या जमीन सरकारने ताब्यात घेतल्यास आमच्यावर उपासमारीची पाळी येऊन आमचे कुटुंब रस्त्यावर येणार आहे. तेंव्हा कृपया रिंगरोडची योजना रद्द करावी. दुसरी गोष्ट म्हणजे हलगा -मच्छे बायपासला शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील शेतजमिनींचे भूसंपादन करण्यात आले आहे. बायपास रस्त्याचा प्रकल्प राबवत असताना आता त्यापासून अवघ्या 2 कि. मी. अंतरावर पुन्हा रिंगरोडची गरज नाही. रिंगरोडद्वारे सुपीक शेतजमिनी उध्वस्त करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न आहे. तेंव्हा हा प्रकार तात्काळ थांबवला जावा. बेळगाव शहरातील वाहतूक समस्या निकालात काढण्यासाठी रिंगरोड ऐवजी शेतजमिनींचे नुकसान होणार नाही असा अन्य पर्याय अवलंबवावा.

आमच्या शेतजमिनी वडिलोपार्जित आहेत. यावर आम्ही आणि आमची जनावरे जगत आलो आहोत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रिंगरोडसाठी आम्ही आमच्या शेतजमिनी देणार नाही असे येळ्ळूर परिसरातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट करून रिंग रोडला तीव्र विरोध दर्शविला.Yellur ring road

कायदा सल्लागार ॲड. श्याम पाटील यांनी शेतकऱ्यांतर्फे अधिकाऱ्यांसमोर बाजू मांडली. याप्रसंगी शेतकरी बाळाप्पा सायनेकर, दुदाप्पा बागेवाडी, विलास घाडी, प्रकाश अष्टेकर, महेश जुवेकर, रमेश मेणशे, दत्ता उगाडे, मनोहर घाडी, अनिल घाडी, मारुती बेळगावकर, बाळु धामणेकर, चंद्रशेखर पाटील, चांगप्पा सायनेकर, बसवत सायनेकर, परशराम हलगेकर, महादेव घाडी, तुकाराम धामणेकर, ॲड. सडेकर आदी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲड. श्याम पाटील यांनी येळ्ळूर, झाड शहापूर भागातील सर्व शेती सुपीक असून तेथे दुबार व तिबार पिके घेतली जातात. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून शेतात व घराजवळ गोठे बांधले आहेत.

त्यामुळे शेती गेल्यास शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहा बरोबरच चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सुपीक जमिनीतून रिंग रोड करण्यास पूर्णपणे विरोध असल्याची माहिती शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बेळगाव रिंग रोड प्रकल्प रद्द करावा अन्यथा आम्हाला न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई पुन्हा तीव्र करावी लागेल, असे स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.