बेळगाव लाईव्ह : परिवहन मंडळांना स्त्रीशक्ती योजनेचा फायदा होईल, अशी अपेक्षा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, स्त्रीशक्ती योजनेंतर्गत राज्यातील महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेचे योग्य नियोजन करण्यात आले असून या प्रकल्पाचा फायदा राज्य परिवहन मंडळांना होईल, असे मानले जात आहे. असे राहिल्यास परिवहन मंडळांची स्थिती सुधारून कर्मचाऱ्यांचे पगारही वाढू शकतात, असे ते म्हणाले.
राज्यातील वीज पुरवठा मंडळांकडून वीज बिलात वाढ होत असल्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी वीजदरवाढ कोणत्या आधारावर केली आहे याची आपल्याला माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. वीज दरवाढ ही नियमित प्रक्रिया आहे. वीज नियामक आयोगाने एप्रिलमध्ये या वाढीला मान्यता दिली होती. कदाचित निवडणुकीमुळे दरवाढ तातडीने लागू झाली नाही. केवळ कर्नाटकातच नाही तर संपूर्ण देशात विजेची समस्या आहे. दरवाढीची समस्या तात्पुरती आहे. त्यावर तोडगा काढला जाईल, असे ते म्हणाले.