बेळगाव लाईव्ह : शहरात स्मार्ट सिटी योजने अंतर्गत निकृष्ट दर्जाचे कामकाज झाले आहे. स्मार्ट सिटी योजनेत अनेक समस्या आढळल्या आहेत. शिवाय बुडामध्येही भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुढे आला असून बेळगावमधील भाजपच्या आमदारांच्या हातचे बाहुले बनून काही अधिकारी कार्यरत आहेत. कायदा सोडून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गेटपास दिला जाईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी आज दिला आहे.
आज बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट शहरातील भाजप आमदारांवर निशाणा साधला. आपण पंतप्रधान मोदी किंवा गृहमंत्री अमित शहा यांना एकवेळ खुश करू शकतो. मात्र बेळगावमधील भाजप आमदाराला खुश करणे इतके सोपे नसल्याचे त्यांनी म्हटले. या आमदारांचा कारभार भयानक आहे. अनेक अधिकारी आमदारांच्या हातचे बाहुले बनून कार्यरत असून आता अधिकारी बदलण्याचे मोठे आव्हान असल्याचे सांगत अप्रत्यक्षरीत्या भाजप आमदारांना टोला लगावला.
शहरांतर्गत झालेली स्मार्ट सिटीची काही कामे कोणतीही वर्क ऑर्डर नसताना करण्यात आली आहेत. जी कामे आधीच पूर्ण झाली आहेत ती निकृष्ट दर्जाची आहेत. बुडामध्येही काही अव्यवहार झाला आहे.
या समस्या दुरुस्त करण्यास बराच वेळ लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याबाबतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची सखोल चौकशी झाली पाहिजे. यासाठी ७ जून रोजी महानगर पालिका सभागृहात बैठक बोलाविण्यात आली आहे, अशी माहिती सतीश जारकीहोळी यांनी दिली.