Friday, May 24, 2024

/

बेळगावच्या सर्वांगीण विकासाबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे महत्वपूर्ण निर्णय

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रेल्वे, पाटबंधारे, महामार्ग, रिंगरोड, उड्डाणपूल बांधकाम, भूसंपादन, पुनर्वसन आदींसह जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित प्रत्येक प्रकल्पाच्या अंमलबजावणी प्रक्रियेला गती द्यावी.

या प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या तांत्रिक अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात, अशा सूचना जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात भूसंपादन, रेल्वे, राष्ट्रीय महामार्गासह विविध प्रकल्पांच्या प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.

बहुचर्चित रिंगरोडच्या प्रस्तावासंदर्भात बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि भूसंपादन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. कडोली, होनगा, बेन्नाळी, अगसगा आदी छोटी गावे असून बेळगाव रिंगरोडच्या बांधकामासाठी शेकडो एकर जागा संपादित केल्यास ग्रामस्थांसाठी अडचणीचे ठरणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांची मते ऐकून रचनेत काही बदल करायला हवेत. रिंगरोडसाठी पर्यायी जागा शोधून काढावी, हलगा- मच्छे महामार्गाचे काम सुकर करण्यासाठी प्रलंबित भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी, विविध शासकीय कार्यालयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बहुमजली इमारत बांधण्यासंदर्भात आराखडा लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावा, अशा अनेक महत्वपूर्ण सूचना सतीश जारकीहोळी यांनी केल्या.

 belgaum

याचप्रमाणे रेल्वे उड्डाणपुलासंदर्भातही महत्वपूर्ण निर्णयासाठी सतीश जारकीहोळी यांनी पुढाकार घेतला असून शहरातील पहिल्या व दुसऱ्या गेटच्या उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या निविदा तातडीने मागविण्यात याव्यात. त्यापूर्वी महापालिका सार्वजनिक बांधकाम आणि पोलिस विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून आराखडा निश्चित करू असे त्यांनी सांगितले.

रस्ते ओव्हरपास आणि अंडरपास हे अशास्त्रीय असून त्यामुळे लोकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे रेल्वे विभागाने म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात कोणताही रस्ता ओव्हरपास आणि अंडरपास बांधताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आराखडा अंतिम करणे बंधनकारक आहे. अशी सूचना मंत्र्यांनी केली.

यावेळी बेळगाव रिंगरोड, रेल्वे प्रकल्प यासह महत्त्वाच्या प्रकल्पांवर त्यांनी सविस्तर चर्चा करून भूसंपादन किंवा न्यायालयाची मनाई यासारख्या तांत्रिक अडचणी प्राधान्याने सोडवून कामे वेळेत पूर्ण करावीत, असे सांगितले. कमलापुरा गावाच्या स्थलांतरासाठी ७२ एकर जमीन आवश्यक असून गावकऱ्यांनी गावालगतच्या ठिकाणी जाण्याची विनंती केल्याने अधिकाऱ्यांनी याबाबत बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अथणी तालुक्यात यापूर्वीच तयार झालेले पुनर्वसन केंद्र भूखंड स्थानिक आमदाराच्या नेतृत्वाखाली संबंधित ग्रामस्थांना तातडीने वितरित करावेत. ग्रामस्थांना पुनर्वसन केंद्रात स्थलांतरित करताना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे मंत्र्यांनी सांगितले.

पूरग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या गावांचे स्थलांतर किंवा पुनर्वसन करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया जलद करावी. न्यायालयीन प्रक्रियेत काही अडथळे किंवा खटले असतील तर ते तातडीने सोडवावेत, पुनर्वसनासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा., ग्रामस्थांचे म्हणणे व न्यायालयाचा आदेश लक्षात घेऊन चिक्कोडीजवळील जगनूरसह पाच गावांच्या स्थलांतरासाठी योग्य तो प्रस्ताव तयार करावा, असे त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.Dc meeting satish j

राष्ट्रीय महामार्ग जंक्शन ते संकम हॉटेल मार्गे किल्ला येथील अशोक सर्कलजवळ उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित रस्ता उड्डाणपूल बांधकाम प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती घेतली आणि प्रस्तावित प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी बसस्थानक, आरटीओ सर्कलसह शहरातील प्रवेश मार्गांवरील वाहतूक व्यवस्थापन हे उड्डाणपुलाचे हे मुख्य उद्दिष्ट असावे. त्याच पद्धतीने त्याची रचना करावी, त्यानंतर पिरनवाडीपर्यंतच्या विस्ताराचा आढावा घेता येईल, असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

यावेळी पाण्याच्या समस्येबाबतही त्यांनी सूचना करत उन्हाळा असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे सांगितले. सोशल मीडियावर खोट्या बातम्या आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या लोकांवर नजर ठेवली पाहिजे. असे प्रकार आढळून आल्यास पोलीस विभागाने त्वरित स्वेच्छेने गुन्हा नोंदवावा. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र युनिट स्थापन करावे, सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील व्यापारी केंद्रे व महामार्गावर सीसीटीव्ही बसविण्याची पावले उचलावीत, अशा सूचना जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील, बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम.बी.बोरलिंगय्या, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.संजीव पाटील आदींसह रेल्वे, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, नागरी पाणीपुरवठा, राष्ट्रीय महामार्ग, भूसंपादन, महसूल, पोलीस अशा विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.