अन्यायी अवास्तव वीज दरवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी आणि पूर्वीप्रमाणेच विज बिल आकारले जावे या मागणीसह पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा करावा या मागणीसाठी चव्हाट गल्ली येथील महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
सार्वजनिक महिला मंडळाच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी चव्हाट गल्ली येथील महिलांनी उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
आमचे प्रत्येकाचे घरगुती वीज बिल मागील महिन्याच्या तुलनेत या महिन्यात तिप्पट आले असल्यामुळे आम्ही त्रासात पडलो आहोत. ज्यांचे दरमहा 500 रुपये वीज बिल येत होते ते यावेळी तिप्पटीने वाढवून देण्यात आले आहे या पद्धतीने अवास्तव वीज बिल आकारल्यास गरिबांनी कसे जगायचे? त्यासाठी ही वीज दरवाढ तात्काळ मागे घेण्यात यावी अशी मागणी निवेदनात केली आहे.
त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची देखील मोठी समस्या असून 24 तास पाणीपुरवठा योजना राबवण्यात एल अँड टी कंपनी अपयशी ठरली आहे. प्रत्येकाकडून 4000 रुपये वसूल करून नवी पाईपलाईन घालण्यात आली असली तरी सध्या दहा-पंधरा दिवसातून एकदा पाणी येते. याखेरीज कांही ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही ते पाणी पिल्यामुळे अनेक जणांना उलट्या, जुलाब लागून ते आजारी पडत आहेत. पाणी ही मनुष्यासाठी अति जीवनावश्यक बाब आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
तेंव्हा अन्यायी वीज दरवाढ तात्काळ रद्द करण्याबरोबरच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जावा. तसेच एल अँड टी कंपनीचा परवाना रद्द केला जावा. प्रामुख्याने विज बिल आणि पाण्याच्या समस्येकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊन त्यांचे निवारण करावे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चा प्रसंगी चव्हाट गल्लीतील महिलांकडून भारत माता की जय, वंदे मातरम, लाईट बिल कमी करा अशा घोषणा देण्यात येत होत्या. आपल्या मागणी संदर्भात सार्वजनिक महिला मंडळाच्या एका प्रतिनिधीने प्रसारमाध्यमांशी बोलताना वीज दरवाढ तात्काळ रद्द झाली पाहिजे असे सांगितले.
सध्या सर्वांना अवास्तव वीज बिल आकारण्यात आले आहे. शटर, दरवाजे बंद असताना देखील बाहेरच्या बाहेर अंदाजे युनिट घालून वीज बिले देण्यात आली असा आरोप करून सध्याची वीज दरवाढ सर्वसामान्यांसह गरिबांना परवडणारे नाही. तेंव्हा आम्हाला पूर्वीप्रमाणेच लाईट बिल आकारावे आणि न्याय द्यावा असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी महिलावर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.