बेळगाव लाईव्ह : सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींचे ऐकून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यासह तीन एमडींवर कारवाई करण्यात आली हे एक उत्तम उदाहरण असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते राजकुमार टोपण्णावर म्हणाले.
मंगळवारी कन्नड साहित्य भवन येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, बेळगाव नगर विकास प्राधिकरणात बेकायदेशीर रित्या जागेचा लिलाव करण्यात आला. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी शहर पोलीस विभाग आणि लोकायुक्तांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. बेळगाव लोकायुक्तांनी बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राजकुमार टोपण्णावर यांनी दिली.
याचप्रमाणे स्मार्ट सिटी योजने अंतर्गत स्थानिक आमदाराचे म्हणणे ऐकून बेळगाव व्हॅक्सिन डेपोवर आरोग्य विभागाची परवानगी न घेता सिटी एव्हिएशन गॅलरी, अँप थिएटर अशा पद्धतीची कामे करण्यात येत होती. हे कामकाज शहराच्या पर्यावरणाला घातक ठरणारे होते.
स्मार्ट सिटी कामकाजाला आमचा विरोध नाही मात्र व्हॅक्सिन डेपोमध्ये सुरु असलेले काम योग्य नसल्याचे आमचे म्हणणे होते. याविरोधात स्मार्ट सिटीच्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आपल्या संघर्षाचा विजय आहे, असे टोपण्णावर म्हणाले.
सरकार येतात आणि जातात. मात्र अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींसाठी नव्हे तर जनतेसाठी काम केले पाहिजे. अधिकारात असलेल्या आमदारांचे म्हणणे ऐकून आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्यास टायचे असेच दुष्परिणाम भोगावे लागतात, असे राजकुमार टोपण्णावर म्हणाले.