टिळकवाडी पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे गेट येथील रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी तात्काळ निविदा काढणे अत्यावश्यक आहे. मात्र तत्पूर्वी रेल्वे खात्याने बेळगाव महापालिका (सीसीबी), सार्वजनिक बांधकाम खाते (पीडब्ल्यूडी) आणि पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून ब्रिजचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे.
सध्या रेल्वे खात्याने बांधलेले शहरातील रोड ओव्हर ब्रिज आणि अंडरपास हे अवैज्ञानिक असून त्यामुळे जनतेची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी यापुढे भविष्यात ओव्हरपास आणि अंडरपास रस्ते बांधताना त्यांचा अंतिम आराखडा (डिझाईन) तयार करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा -सल्लामसलत करावी, अशी सक्त सूचना केली आहे.
भू-संपादन, रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांसह अन्य विविध प्रकल्पांची आढावा बैठक नुकतीच पालकमंत्री जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे. या बैठकीच्या अनुषंगाने विचार करता शहराच्या सर्वंकष पायाभूत सुविधांचा सुधार करण्याबरोबरच पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे गेट येथील फ्लाय ओव्हरचे बांधकाम प्राधान्याने करणे गरजेचे आहे.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे रेल्वेने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे गेट येथील आरओबींच्या बांधकामासाठी कोणत्याही निधीची तरतूद केलेली नाही.
तथापि आता जिल्हा पालकमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार हा विशेष करून तिसऱ्या रेल्वे गेट आरओबीचे विनाशकारी परिणाम लक्षात घेता स्वागतार्ह म्हणावा लागेल.
टिळकवाडी पहिल्या आणि दुसऱ्या रेल्वे गेटच्या ठिकाणीची जागा मर्यादित अरुंद आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी शहरी नियोजकांना अतिशय विचारपूर्वक योग्य उपाय काढावा लागणार आहे.