Tuesday, September 17, 2024

/

भाजप नेते, माजी खासदार रमेश कत्ती काँग्रेसच्या वाटेवर?

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी उलथापालथ झाली असून भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या दिशेने पाऊले टाकत आहेत. एकामागोमाग एक काँग्रेसच्या वाटेने जाणाऱ्या नेत्यांमध्ये आता भाजप नेते, माजी खासदार आणि डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांचादेखील समावेश असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

विधानसभेच्या रणधुमाळीनंतर भाजप आणि काँग्रेस आता आगामी लोकसभेच्या लढाईच्या तयारीला लागले असून, जिल्ह्यात 11 आमदार असलेल्या काँग्रेसने लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपकडून हिसकावून घेण्याची रणनीती आखली आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून काँग्रेसमधून रमेश कत्ती निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरु असून त्यांना पक्षाकडे आकर्षित करून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे.

चिक्कोडीमध्ये ८ पैकी 6 मतदारसंघ जिंकल्याने कॉंग्रेसची ताकद वाढली असून दोनवेळा लोकसभा निवडणूक लढवलेले प्रकाश हुक्केरी सध्या विधानपरिषद सदस्य असल्याने ते लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याव्यतिरिक्त सध्या मतदारसंघात ओळखले जाणारे नेते कॉंग्रेस पक्षात नाहीत. त्यामुळे यापूर्वी विजयी झालेले आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून या भागात प्रभाव असलेले रमेश कत्ती यांना भाजपच्या अण्णासाहेब जोल्ले यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसमध्ये खेचून आणण्याची कसरत सुरु झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

काँग्रेसच्या या ‘ऑफर’ला रमेश कत्ती यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती उपलब्ध झाली असून २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत तिकीट हुकलेल्या कत्तींनी भाजपविरुद्ध बंड पुकारण्याचा निर्णय घेतल्याचेही समजते. मागील विधानसभा निवडणुकीत रस नसतानाही रमेश कत्ती यांनी चिक्कोडी सदलगा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यांनी विजयासाठी फारशी मेहनत घेतली नाही.

त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरी यांचा दणदणीत विजय झाला. आगामी लोकसभा निवडणुकीत रमेश कत्ती यांना हुक्केरी कुटुंबीय पाठिंबा देणार असल्याची चर्चाही सुरु असून रमेश कत्ती यांच्या कॉंग्रेस प्रवेशाला प्रकाश हुक्केरी याचबरोबर अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी, कागवाडचे आमदार राजू कागे हेदेखील रमेश कत्ती यांना पाठिंबा देणार असल्याचे बोलले जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.