Monday, December 30, 2024

/

महापौर, उपमहापौरांनी केली तुरमुरी कचरा डेपोची पाहणी

 belgaum

बेळगाव शहरातील कचरा ज्या ठिकाणी डम्प केला जातो त्या तुरमुरी येथील महापालिकेच्या कचरा डेपोच्या ठिकाणी कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जाते की नाही याची पडताळणी करण्यासाठी महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी आज सकाळी अधिकाऱ्यांसमवेत या कचरा डेपोला भेट दिली. तसेच कचरा डेपोची एकंदर अवस्था आणि कामकाज पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली.

बेळगाव शहरात दररोज 300 टन कचरा तयार होतो महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी दररोज हा कचरा संकलित करून घंटागाडीतून तुरमुरी येथील प्रकल्पाच्या ठिकाणी घेऊन जातात.

तुरमुरी येथील कचरा प्रकल्प मध्ये त्यावर प्रक्रिया केली जाते या प्रकल्पाचा ठेका रामकी एनव्हीरो या कंपनीकडे आहे. तेथे कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती केली जाते. मात्र त्या खतापासून महापालिकेला उत्पन्न मिळत नाही, उलट प्रक्रियेसाठी प्रत्येक टनामागे ठराविक रक्कम महापालिकेकडून कंपनीला दिली जाते.

लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सदर कचरा डेपो मनुष्य वसाहतीपासून दूर कोठेतरी सुरू करण्याऐवजी तो तुरमुरी या गावाजवळ सुरू करण्यात आल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून सदर कचरा डेपो अन्यत्र हलविण्याची मागणी केली जात आहे. कारण त्यामुळे तुरमुरी गावचे आरोग्य धोक्यात आले असून पर्यावरण पूर्णपणे दूषित झाले आहे.

आज खुद्द महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांना तुरमुरी ग्रामस्थ असह्य परिस्थितीला तोंड देत आहेत याची प्रचिती आली. पाहणीसाठी या उभयता जेंव्हा तुरमुरे कचरा डेपोच्या ठिकाणी पोहोचल्या. त्यावेळी उपस्थित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना प्रथम फेसमास्क परिधान करण्याची विनंती केली.

त्यानंतर महापौर व उपमहापौरांनी मास्क घालून कचरा डेपोची पाहणी केली. या पाहणी दौऱ्या दरम्यान उभयतानी तेथील एकंदर परिस्थिती पाहून तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे कळते. याप्रसंगी नगरसेवक राजशेखर डोणी, श्रेयस नाकाडी, आरोग्य विभागाचे अधिकारी कलादगे आदिंसह अन्य अधिकारी उपस्थित होते.

प्रचंड विरोध असतानाही बेळगाव महापालिकेकडून सदर कचरा डेपो कार्यरत ठेवण्यात आला आहे. मात्र त्यामुळे तुरमुरी गावकऱ्यांचे आरोग्य पूर्णपणे धोक्यात आले आहे. गेल्या कांही वर्षात सदर कचरा डेपोतून वाहणारे दूषित विषारी पाणी पिऊन अनेक गाई, म्हशींसारख्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. याखेरीज प्रचंड दुर्गंधीसह दूषित झालेल्या हवेमुळे गावातील अनेकांना अकाली मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

घाण केरकचऱ्यासह शहर परिसरातील मृत प्राण्यांची कलेवर या कचरा डेपोत आणून टाकली जात असल्यामुळे या ठिकाणी कावळे आणि गिधाड्यांची संख्या तर अगणित झाली आहे. या सर्व समस्यांबाबत लोकहिताच्या दृष्टीने वारंवार तक्रार करून देखील दुर्दैवाने प्रशासन आणि आरोग्य खात्याकडून त्याची कोणतीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे चुरमुरे आणि परिसरातील नागरिकांमधील असंतोष कायम आहे. आता राज्यात काँग्रेसचे नवे सरकार आले आहे. तेंव्हा महापौरांसह नव्या लोकप्रतिनिधींनी तुरमुरी कचरा डेपोमुळे निर्माण झालेल्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच तुरमुरी गावकऱ्यांच्या जीविताच्या दृष्टीने लवकरात लवकर सदर कचरा डेपोचे अन्यत्र लोक वसाहतीपासून दूर स्थलांतर करावे, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.