राज्यातील मान्सूनचे आगमन लांबले असून उत्तर कर्नाटकात पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून पावसासाठी प्रार्थना केली.
दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने यंदा जून महिना संपत आला तरी दडी मारली आहे. मान्सूनचा पत्ता नसल्यामुळे सर्वत्र रखरखाट पसरून पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे.
जनतेला पाणी टंचाईने ग्रासण्याबरोबरच शेतीच्या कामाचा खोळंबा झाला आहे. परिणामी शेतकरी अडचणीत आला असून त्याच्यावर आर्थिक संकटाचे सावट आले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वजण पावसासाठी देवाचा धावा करू लागले आहेत.

त्या अनुषंगाने शहरातील मुस्लिम बांधवांनी देखील अंजुमन संस्थेच्या ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज अदा केला आणि लवकरात लवकर पावसाला सुरुवात व्हावी अशी अल्लाकडे प्रार्थना केली.
शहरातील मुस्लिम धर्मगुरू मुफ्ती अब्दुल अजीज खान यांच्या नेतृत्वाखाली सदर नमाज पठणासाठी शेकडो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर उपस्थित होते.