belgaum

व्यावसायिक अक्षम्य गैरवर्तनाबद्दल बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी यांची वकिली सनद कायमची रद्द करण्याचा आदेश कर्नाटक राज्य बार कौन्सिलने बजावला आहे.

भूसंपादन मोबदल्यात अशीलाच्या नावे मंजूर भरपाई रक्कम अध्यक्ष ॲड. यतनट्टी यांनी आपल्या खात्यावर वळविल्याच्या आरोपाखाली सदर कारवाई करण्यात आली आहे. याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, खानापूर -गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी रुमेवाडी (ता. खानापूर) येथील शेतकरी सुभाष रामाप्पा पुजारी यांची जमीन संपादित करण्यात आली आहे.

या मोबदल्यात सुभाष पुजारी यांना 99 लाख 68 हजार 539 रुपयांची रोकड मंजूर करण्यात आली. ही रक्कम बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षांनी आपल्या खात्यावर वळविली आहे. या विरोधात पुजारी यांनी राज्य बार कौन्सिलकडे दाद मागितली होती. चौकशी अंती गैरप्रकार सिद्ध झाल्यामुळे ज्येष्ठ वकील ॲड. एन. एस. नरसिंह स्वामी, ॲड. आर. राजाण्णा आणि ॲड. बी. आर. चंद्रामाऊली यांचा समावेश असलेल्या कौन्सिलच्या शिस्तपालन समितीने ॲड. यतनट्टी यांच्या विरोधात कारवाई करत त्यांची सनद कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेऊन तसा आदेश बजावला आहे.

याखेरीज शेतकऱ्याची 99.68 लाख रुपये इतकी भरपाई रक्कम 12 टक्के व्याजासह येत्या दोन आठवड्यात परत शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात यावी. याव्यतिरिक्त 20 हजार रुपयांचा दंड भरावा. दंडाच्या रकमेपैकी 10 हजार रुपये तक्रारदाराला देण्यात यावे आणि उर्वरित 10 हजार रुपये कर्नाटक बार कौन्सिलला द्यावेत असा आदेश देखील बजावला आहे.

दरम्यान, ॲड. प्रभू यतनट्टी यांनी आपल्यावरील आरोपाचा इन्कार केला असून ही चौकशी म्हणजे आपल्या विरुद्धचा कट असल्याचे नमूद केले आहे. तो शेतकरी माझा अशीलच नाही. शिस्तपालन समिती समोर मला स्वतःची बाजू मांडण्याची संधीच देण्यात आली नाही.

यासाठी मला कौन्सिलचा आदेश मान्य नसून मी त्या आदेशा विरुद्ध न्यायालयात अपील करून दाद मागणार आहे, असेही ॲड. यतनट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

News source: The Hindu

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.