पावसाअभावी घटप्रभा नदीपात्रातील पाण्याने तळ गाठल्यामुळे नदीतील लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना गोकाक तालुक्यातील नल्लानट्टी गावाच्या ठिकाणी घडली असून हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
यंदा मान्सून लांबला असून जून महिना संपत आला तरी म्हणावे तसे पावसाचे आगमन झालेले नाही. परिणामी पावसाभावी राज्यातील नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा नदी देखील त्याला अपवाद नाही. या नदीतील पाण्याने काही ठिकाणी तळ गाठण्यास सुरुवात केली असल्यामुळे नल्लानट्टी (ता. गोकाक) गावाजवळ नदीपात्रातील लाखोच्या संख्येने मासे मृत्युमुखी पडले आहेत. सदर मृत माशांचा खच नदी नदीकाठी पडलेला तसेच पात्रातील शिल्लक पाण्यात तरंगताना पहावयास मिळत आहे. प्रथमच इतक्या प्रचंड संख्येने नदीतील मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत असून घटनास्थळी बघ्यांची गर्दी होत आहे.
नल्लानट्टी गावाप्रमाणे जवळच्या बळोबाळ आणि बिरणगट्टी या गावालगत असलेल्या घटप्रभेच्या पात्रात देखील मोठ्या संख्येने मासे मृत झाल्याचे दिसून येत आहे. लाखोंच्या संख्येने मृत्युमुखी पडलेले नदीतील मासे हा सध्या या परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
दरम्यान मृत मासे कुजत असल्यामुळे या गावांच्या परिसरात सर्वत्र प्रचंड दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. या पद्धतीने वातावरण दूषित झाल्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरी लोकप्रतिनिधी आणि संबंधित खात्याने तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे.