महिलांची आगामी आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा आणि जागतिक शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा -2023 या अनुक्रमे नेपाळमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात आणि दक्षिण कोरिया येथे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या स्पर्धांसाठी बेळगावच्या सुप्रसिद्ध महिला शरीरसौष्ठवपटू केतकी पाटील यांची भारतीय संघात निवड झाली आहे.
आपले वडील मनोहर पाटील यांच्याकडून पुरुषांप्रमाणे मजबूत शरीरसौष्ठव कमावण्याची प्रेरणा घेणाऱ्या केतकी पाटील यांना प्रारंभीच्या काळात त्यांच्या वडिलांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभले. त्यानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव पंच अजित सिद्धनावर यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू शेखर लाड यांचे खास प्रशिक्षण लाभले.
आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण कॅम्प येथील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमधून पूर्ण करणाऱ्या केतकी पाटील यांनी लिंगराज कॉलेजमधून पदवीपूर्व पदवी मिळवण्याबरोबरच केएलएस आयएमइआर संस्थेतून मास्टर्स डिग्री संपादन केली आहे.
अल्पावधीत महिलांच्या शरीरसौष्ठव क्षेत्रात नांव कमावणाऱ्या केतकी यांचा नोव्हेंबर 2019 मध्ये जगजीत मदन डोंगरे यांच्याशी विवाह झाला. मात्र विवाह नंतर देखील पतीचा संपूर्ण पाठिंबा आणि प्रोत्साहनामुळे महिला शरीरसौष्ठव क्षेत्रातील त्यांच्या यशाने नवी उंची गाठली.
या क्षेत्रातील आपले ध्येय गाठण्यासाठी केतकी कठोर मेहनत घेत असतात. आपल्या खाजगी व्यायामशाळेत त्या दररोज जवळपास 4 तास व्यायाम करण्याबरोबरच काटेकोरपणे निरोगी आहार घेतात. गेल्या 2018 सालापासून महिलांच्या शरीर सौष्ठव स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या केतकी पाटील यांनी आतापर्यंत अनेक मानाचे किताब आणि पुरस्कार मिळवले आहेत.
आता आशियाई आणि जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्यामुळे त्यांचे शरीरसौष्ठव क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे