वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस रेल्वेला एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत, ही स्वागतार्ह बाब असली तरी या रेल्वेचे एसी कोच कमी करून सर्वसामान्यांच्या सोयीसाठी त्या जागी पूर्वीप्रमाणे 8 -9 नॉन एसी कोच कायम ठेवावेत, अशी जोरदार मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.
नैऋत्य रेल्वेने आठवड्यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे वास्को निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला नवे एलएचबी कोच (डबे) जोडण्यात आले आहेत. प्रवाशांचा बेळगाव -दिल्ली रेल्वे प्रवास आरामदायी सुखकर व्हावा हा यामागील उद्देश आहे. बेळगाव -बेंगलोर एक्सप्रेस रेल्वेला अर्थात अंगडी एक्सप्रेसला देखील एलएचबी कोच आहेत.
एसी कोचेससह या सर्व स्लीपर कोचीसची संख्या सुमारे 7 -8 आहे. पूर्वी वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला देखील सर्व स्लीपर कोचिस होते. मात्र सध्याच्या एक्सप्रेसला फक्त दोन स्लीपर एलएचबी कोच जोडण्यात आले असून इतर एम-1, एम-2 अशा क्रमाने सर्व एसी कोच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला या एसी कोचचे प्रवास भाडे न परवडणारे आहे.
परिणामी या रेल्वेला पूर्वीप्रमाणे प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळणे कठीण असल्याचे मत जाणकारांतून व्यक्त केले जात आहे. याखेरीज हे नव्या पद्धतीचे एलएचबी कोच थर्ड एसी पेक्षा थोडे अरुंद आहेत. इतर सर्व एसी कोच असल्यामुळे सध्या एलएचबी कोचीसमध्ये प्रवाशांची गर्दी झालेली पहावयास मिळत आहे.
डब्यात झालेल्या प्रवाशांच्या दाटीवाटीमुळे तिकीट चेकरना देखील तिकिटांची तपासणी करणे अवघड जात आहे. त्याचप्रमाणे लष्करी जवानांची वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला पसंती असते. मात्र सध्याच्या एलएचबी कोच मधील अरुंद जागेमुळे या जवानांना रेल्वेत आपले ट्रंक वगैरे सामान लावताना मोठी कसरत करावी लागत आहे. एकंदर सध्या वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला एलएचबी कोच जोडण्यात आले असले तरी या अपुऱ्या कोचेससह इतर सर्व एसी कोच असल्यामुळे प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत आहे.
तेंव्हा या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन नैऋत्य रेल्वेने वास्को -निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस रेल्वेचे एसी कोच कमी करून सर्वसामान्यांच्या सोयीसाठी त्या जागी पूर्वीप्रमाणे 8 -9 नॉन एसी कोच कायम ठेवावेत. ज्यामुळे सामान्य नागरिकाला देखील या रेल्वेचा लाभ घेता येईल, अशी जोरदार मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.