Thursday, October 10, 2024

/

गावोगावी व्यवसायासाठी भटकंती करणाऱ्या लोहार समाजाची व्यथा!

 belgaum

लेऊ लेनं गरीबीचं चनं खाऊ लोखंडाचं..!
गावोगावी व्यवसायासाठी भटकंती करणाऱ्या लोहार समाजाची व्यथा!

बेळगाव लाईव्ह विशेष : जगण्यासाठी प्रत्येक जण धडपडतो. कुणाची धडपड हि एसीमधल्या ऑफिस मध्ये असते, तर कुणाची धडपड हि उन्हातान्हात वावरत असते.. जगण्यासाठी प्रत्येकाला ‘हात-पाय’चालवावेच लागताच अशी नियतीची रीतच आहे. आपल्या उदरनिर्वाहासाठी गावोगावी आपल्या मुलाबाळांसहित आपला व्यवसाय सांभाळणाऱ्या विश्वकर्मा समाजाच्या लोहार समाजाचीही अशीच व्यथा आहे.

सध्या बेळगावमध्ये संभाजीनगरमधील लोहारी काम करणारे कुटुंब बेळगावमधील बी. एस. येडियुरप्पा मार्गावरील आलारवाड ब्रिज येथे बस्तान मांडून आहे. यांच्याशी आज ‘टीम बेळगाव लाईव्ह’ ने संवाद साधला. यावेळी यांत्रिकीकरणामुळे या समाजाचा पारंपरिक व्यवसाय अडचणीत आला असून उपजीविकेच्या व्यवसायावरच कुऱ्हाड आल्याने या समाजाला उपासमारीच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे सनी लोहार याने सांगितले.

सध्या शेतीची कामे जोर असल्याने अनेक शेतकरी शेती अवजारे खरेदी करतात. यासाठी आपण गावोगावी जाऊन बस्तान मांडतो. तुटपुंज्या कमाईवर आपल्यासह संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सरकारने आपल्या समाजासाठी आर्थिक पाठबळ द्यावे, अशी इच्छा त्याने व्यक्त केली.

अतिशय कष्टाळू समाज म्हणून या समाजाची ओळख आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या या समाजातील समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही राज्यांमध्ये आरक्षण देखील पुरविण्यात आले आहे. भटके व विमुक्त या गटात मोडणाऱ्या या समाजाची अद्यापही ओढाताण काही कमी झाली नसून पूर्वापार चालत आलेला व्यवसाय आजही लोहार समाजातील अनेकजण पुढे चालवत आहेत.Lohar samaj

पारंपरिक व्यवसाय संपुष्टात आल्याने हा समाज आता शहराकडे वळला आहे. लोहारी काम करणारे कुटुंब आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत गावोगावी भटकंती करत उदरनिर्वाह करत आहे. जीवनाचा अतिशय खडतर प्रवास या समाजाच्या वाट्याला आला असून यावर मात करत रात्रंदिवस मेहनत करून उदरनिर्वाह सध्या सनी लोहार आणि यांच्यासारखी अनेक कुटुंब करत आहेत. बीड आणि लोखंड अशा धातूंचे भाव वधारले आहेत. मात्र अजूनही शे-दोनशे रुपयांच्या घरातच अवजारांची विक्री होत असल्याने अधिक कष्ट आणि कमी मोबदला अशा परिस्थितीत सध्या हा समाज काम करत आहेत.

गेली कित्येक दशके हा समाज भटकंतीचा करत आला आहे. गावोगावी फिरून शेतीला पूरक अशी अवजारे तयार करून देण्याचे काम करणारा हा लोहार समाज आधुनिकीकरणात शेतीची पद्धत देखील यांत्रिकीकरणाकडे वळल्याने अनेक यातना सहन करत आहे. आधीच शिक्षण आणि विकासापासून कोसो दूर असणाऱ्या या समाजाला आता बेरोजगारीच्या समस्येला देखील सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

शिक्षणाची कमतरता, गरिबी, भटकंती करून उदरनिर्वाह चालविणाऱ्या या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार सह सामाजिक सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. स्वबळावर व्यवसाय उभारण्यासाठी सरकारने त्यांना आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.