बेळगाव उत्तर विभागाचे नूतन पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) म्हणून विकाशकुमार विकास यांनी आज बुधवारी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी नव्या पोलीस महानिरीक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
पदभार स्वीकारण्यासाठी कार्यालयाच्या ठिकाणी आलेल्या पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकास यांचे सर्वप्रथम पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याबरोबरच त्यांना गार्ड ऑफ ऑनरद्वारे मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर आयजीपी विकाशकुमार विकास यांचा त्यांच्या हाताखालील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी परिचय करून देण्यात आला. अधिकार पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना नूतन पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकास म्हणाले की, मी बेळगाव मध्ये पूर्वी काम केले असून त्या वेळच्या कांही चांगल्या आठवणी आजही माझ्या लक्षात आहेत.
गेल्या 2005 मध्ये मी या ठिकाणी प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून आलो होतो. त्यानंतर आता 18 वर्षांनी मी पुन्हा बेळगावला आलो असून आयजीपी म्हणून सूत्रे हाती घेत आहे. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यासाठी फिल्ड फॉर्मेशन नेतृत्व महत्त्वाचे असते. कायदा आणि सुव्यवस्थेला माझे प्राधान्य असेल. बेळगाव उत्तर विभागांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था उत्तम रहावी यासाठी पोलीस आणि सर्वसामान्य जनता यांच्यात चांगला समन्वय राहील याकडे लक्ष दिले जाईल.
पोलिस आणि जनतेमधील अंतर कमी व्हावे या दृष्टीने माझे प्रयत्न राहतील. आजच मी पदभार स्वीकारला असल्यामुळे साहजिकच मला जास्त माहिती नाही. परंतु येत्या काळात मला माझ्या कार्यक्षेत्राची माहिती होत जाईल. पर्यायाने माझ्यावरील जबाबदारीची मला जाणीव होईल आणि त्यानुसार मी कार्य करेन. माझी आयजीपी म्हणून नियुक्ती झाली असली तरी मला व्यक्तिशः या भागातील जनतेशी समरस होण्यास आवडेल आणि त्यासाठी माझा प्रयत्न राहील. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाशी संबंधित जनतेच्या ज्या कांही समस्या, अडचणी, तक्रारी असतील त्या सोडवण्यास माझे प्राधान्य राहील. जेणेकरून पोलीस आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात चांगला समन्वय निर्माण होण्यास मदत मिळेल, असे आयजीपी विकाशकुमार विकास यांनी शेवटी स्पष्ट केले.
बेळगाव उत्तर विभाग आयजीपी पद आठवड्याभरात तिसऱ्यांदा बदलण्यात आले आहे. गेल्या 20 जून रोजी बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक एन. सतीश कुमार यांची बदली करून त्यांच्या जागेवर हुबळी -धारवाडचे पोलीस आयुक्त रमण गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच दिवशी रात्री आदेशात बदल करून रमण गुप्ता यांच्या ऐवजी बी. एस. लोकेशकुमार यांची वर्णी लावण्यात आली होती आता.
त्यानंतर गेल्या सोमवारी सरकारने लोकेशकुमार यांच्या नियुक्तीचा आदेश देखील रद्द करून त्यांच्या जागी विकाशकुमार विकास यांची नियुक्ती केली आहे. विकाशकुमार हे 2004 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून यापूर्वी ते एमएसआयएलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. ते एक कर्तव्यदक्ष लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात.