शहरात रहदारीला अडथळा ठरणार्या मोकाट जनावरांना पकडून त्यांची श्रीनगर येथील गोशाळेत रवानगी करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली असून नरगुंदकर भावे चौक येथे आज बुधवारी सकाळी महापालिकेच्या पथकाने 8 मोकाट जनावरे पकडली.
शहरात वाहतुकीला अडथळा ठरणार्या मोकाट जनावरांना पकडण्याच्या आदेशानुसार महापालिकेच्या पथकाने आज सकाळी नरगुंदकर भावे चौकातील मोकाट जनावरे पकडून त्यांची श्रीनगर येथील गोशाळेत रवानगी केली.
दोन आठवड्यापूर्वी महापालिकेने गोंधळी गल्लीतील तीन मोकाट जनावरे के. के. कोप्प येथील गोशाळेत दाखल केली आहेत. बेळगाव शहरात अलीकडे मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे. ही जनावरे शहरातील मुख्य रस्त्यांवर मुक्तपणे वावरत असतात.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पदपथासह शहरातील प्रमुख चौक, पदपथ, बस थांबे अशा ठिकाणी या जनावरांचा मुक्काम असतो. त्यामुळे वाहने, पादचारी आणि नागरिकांना या जनावरांच्या अडथळ्याचा सामना करावा लागतो. कळपाने वावरणारी ही मोकाट जनावरे एकाच वेळी रस्त्यावर आल्यास वाहतुकीची कोंडी निर्माण होत असते.
जनावरे रस्त्याच्या मध्येच थांबल्यामुळे त्यांना ओलांडून मार्गक्रमण करताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. अनेकदा लहान-मोठे अपघातही घडतात. सध्या या मोकाट जनावरांसंदर्भातील तक्रारी वाढल्याने आज त्यांना पकडण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे.
दरवेळी मोकाट जनावरांविरुद्धच्या तक्रारी वाढल्या की महापालिकेकडून त्या जनावरांना पकडण्याची मोहीम हाती घेतली जाते. तथापि या कारवाईत सातत्य ठेवले जात नाही. त्यामुळेच ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
तेंव्हा मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला निर्माण होणारा अडथळा, अनेकदा होणारे अपघात लक्षात घेऊन महापालिकेने सातत्याने ही मोहीम राबवावी. तसेच या जनावरांच्या मालकांवरही कडक कारवाई करावी, अशी मागणी लोकांतून होत आहे.