बेळगाव लाईव्ह : यंदा म्हणावा तसा वळिवाचा पाऊस झाला नसल्याने जून महिन्यात देखील कमालीचा उष्मांक जाणवत आहे. काही ठिकाणी वळिवणे हजेरी लावली असून शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीच्या सुरुवात केली आहे. ढगाळ वातावरणामुळे सायंकाळनंतर वातावरणात काहीसा गारवा जाणवत असल्याने पाऊस येणार असे चित्र असतानाच पावसाने मात्र हुलकावणीच दिल्याने प्रत्येकाला आता पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
जून महिना सरु झाला तरी म्हणावा तसा मोठा वळीव पाऊस झाला नाही. खरिप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी आंतरमशागती करून ठेवल्या असून पावसाचे आगमन झाले तर काही ठिकाणी पेरणीची शक्यता आहे. मात्र वातावरणातील उष्मांक पाहता दिवसेंदिवस पाऊस लांबत चालल्याने पेरण्याही लांबणार असल्याचे चित्र आहे.
यंदाचा मान्सून लांबल्यामुळे आणि वळिवानेही दडी मारल्याने नदी पात्र कोरडे पडले आहे. यामुळे यंदा पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. नदीच्या पाण्याला पर्याय म्हणून शेतकरी पिकांना कूपनलिका, विहिरींचे पाणी देत आहेत. मात्र यंदा उष्म्यात देखील मोठी वाढ झाल्याने भूगर्भजलपातळी देखील खालावली असून पिकांना पाणी पुरविण्यात अधिकाधिक वेळ लागत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना पाण्याची समस्या उद्भवली असून शेत पिकांसह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
अनेक ठिकाणी वळिवाने हजेरी लावली आहे तर काही ठिकाणी वळिवाच्या आधी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने मोठे नुकसान देखील झाले आहे. अनेक ठिकाणी शिवारात पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकली असून बहुतांशी ठिकाणी मशागतीची कामे अजूनही सुरु आहेत. वळिवाचा पाऊस झाल्यानंर पेरण्यांना गती मिळणार असून आता प्रत्येकाची नजर वारुणराजाच्या आगमनाकडे लागली आहे.